पालघर, रायगडमध्ये आज अतिवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:16 IST2019-08-08T03:37:24+5:302019-08-08T06:16:35+5:30
मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता

पालघर, रायगडमध्ये आज अतिवृष्टी
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुरुवारी पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यताही वर्तविली आहे.
विदर्भातील बहुतांश भागात गुरुवारी पावसामुळे तापमानात घट होईल. विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचा अंदाज आहे. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत ८ आणि ९ ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याच दरम्यान मध्य-महाराष्ट्रात पाऊस पडेल. मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यांत ८ आणि ९ ऑगस्टला पावसात वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात ९ ऑगस्टपासून तर मध्य-महाराष्ट्रात १० ऑगस्टपासून हवामानाची स्थिती सामान्य होईल.
आठ जिल्ह्यांवर पाऊस रुसला
राज्यातील जालना, परभणी, बीड, लातूर, सोलापूर, वाशिम, यवतमाळ व गोंदिया या जिल्ह्यांवर वरुणराजा रुसल्याचे चित्र आहे. या आठही जिह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे.