'He' made a mental phone call to the Mayor of Thane in the name of Dawood | मानसिक विकृतीतून ‘त्याने’ केला ठाण्याच्या महापौरांना दाऊदच्या नावाने धमकीचा फोन
कापूरबावडी पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देनव्याने केला गुन्हा दाखल खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यातकापूरबावडी पोलिसांनी केली अटक

ठाणे : ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुप्रसिद्ध गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर तसेच छोटा शकीलच्या नावाने उचलून नेण्याची धमकी देणा-या वासिम सादिक मुल्ला (रा. मुंब्रा) याला मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. त्यानंतर, विनयभंग आणि ठार मारण्याची धमकी देणे, या कलमांखाली नव्याने गुन्हा दाखल करून त्याला कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
प्राथमिक चौकशीमध्ये तो आठ वर्षे सौदी अरेबियामध्ये वास्तव्याला होता. तिथे तो एका कार्यालयात शिपायाचे काम करीत होता. त्याचे वडीलही तिथेच नोकरीला होते. वडिलांच्या निवृत्तीनंतर तो मुंब्य्रात आला. सध्या त्याला कोणतेही काम नव्हते. गुगलवरून त्याने यापूर्वीही काही नगरसेविका तसेच महिलांचे मोबाइल क्रमांक शोधून अशाच प्रकारे धमकी तसेच अश्लील संभाषणाचे प्रकार केल्याचीही कबुली दिली. कोणताही कामधंदा नाही. त्यात क्षय आजारानेही तो ग्रस्त आहे. मानसिक विकृतीतून तो असे प्रकार करीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. दरम्यान, त्याला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंब्रा भागातून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके यांच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
* म्हणून नव्याने केला गुन्हा दाखल
सुरुवातीला याप्रकरणी केवळ फोनवरून धमकी दिल्याच्या कलम ५०७ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा १७ सप्टेंबर रोजी दाखल झाला आहे. परंतु, एनसी प्रकरणात अटकेची कारवाई होत नाही. त्याच्या संभाषणाची क्लिपही पोलिसांनी पुन्हा पडताळली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी पुन्हा महापौर मीनाक्षी शिंदे यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची (५०६ भाग २) तसेच अश्लील संभाषण करणे (भारतीय दंड विधान कलम ५०९) अंतर्गत कापूरबावडी पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याच कलमान्वये वासिम याला शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला शनिवारी ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.
असा मिळविला मोबाइल...
वासिम याची एक मैत्रीण मुंब्रा येथील करुन्नम कुरेशी या गृहिणीकडे घरकामाचे काम करीत होती. तिने कुरेशी यांचा मोबाइल काही दिवसांपूर्वी चोरला होता. हा मोबाइल वासिमने तिच्याकडून विकत घेतला. कोणत्याही कागदपत्राविना मिळविलेल्या मोबाइलच्या सीमकार्डमधून आता कोणालाही धमकी देता येईल, कोणत्याही महिलेशी अश्लील संभाषण करता येईल, असा समज वासिमचा होता. यातूनच त्याने महापौर शिंदे यांच्यासह अनेक महिलांशी विचित्रपणे संभाषण केले. महापौरांशी संभाषण करताना तर त्याने कळसच गाठला. थेट दाऊदचे नाव घेऊन त्यांना उचलून नेण्याची भाषा त्याने वापरली. ठाणे पोलिसांनीही अवघ्या ४८ तासांत या प्रकरणाचा छडा लावून त्याला जेरबंद केले.


Web Title: 'He' made a mental phone call to the Mayor of Thane in the name of Dawood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.