हंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट, मुरबाड तालुक्यातील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 01:50 IST2021-04-01T01:50:29+5:302021-04-01T01:50:59+5:30
मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. १८९ योजनांवर कोट्यवधी खर्च केला असला तरी या योजनांची काही ठिकाणी जलकुंभ, उघड्यावर जलवाहिन्या, दारात नळ असूनही पाण्याची बोंब. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

हंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट, मुरबाड तालुक्यातील चित्र
मुरबाड - मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. १८९ योजनांवर कोट्यवधी खर्च केला असला तरी या योजनांची काही ठिकाणी जलकुंभ, उघड्यावर जलवाहिन्या, दारात नळ असूनही पाण्याची बोंब. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. गावात एखाद्या हातपंपाला पाणी असेल तर तिथेच साऱ्या गावाची झुंबड उडते. 
उन्हाळा जस-जसा वाढत जातो तस-तशी भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे पाण्याचे साठेही तळ गाठायला लागतात. पूर्वी ज्या गावात बारमाही पाण्याची सोय आहे अशा गावातच मुली दिल्या जात असत. ज्या गावात नेहमीच पाणीटंचाई त्या गावात मुलगी दिली जात नव्हती. नंतर तिला पाणी भरण्याचा त्रास हा सहन करावा लागणार. हीच परिस्थिती वाढते नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेली आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी रात्रभर जागे राहावे  लागते. 
मुरबाड तालुक्यातील पाटगाव, खोपीवली, घागुर्ली, मेर्दी, म्हाडस, सासणे. केवारवाडी, करचोंडे, तळेगांव, बाटलीची, साजई, फांगवाडी, खांड्याचीवाडी, वाघावाडी (पेंढरी), लोत्याची वाडी या गावात आणि आदिवासी पाड्यात आजही ही परिस्थिती आहे. 
या परिस्थितीवर मात करण्यासाठी डिसेंबरपासून तेथील नागरिक हे प्रशासनाकडे टँकरची मागणी करतात. मात्र, कागदी घोडे नाचविणारे प्रशासन मार्च महिन्याची दाहकता वाढत असतानाही वास्तव जाणून घेण्यासाठी  चालढकल करत आहेत. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. 
तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांकडून टँकरच्या मागणीचे प्रस्ताव आले आहेत. त्यांना एक एप्रिलपासून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
    - अमोल कदम, तहसीलदार.  
 तालुक्यातील २१ गावे व ३२ पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असली त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
    - राधेश्याम आडे, उपअभियंता,     पाणीपुरवठा विभाग  
पाणीटंचाईअभावी रहिवासी त्रस्त
 वासिंद : येथील  खातिवलीजवळील शुभगृह संकुलात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीसमस्या निर्माण झाल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. याठिकाणी महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
 या गृहसंकुलात पाच विंग असून जवळपास १३०० सदनिका आहेत. दोन महिन्यांपासून  येथील गृहसंकुल व्यवस्थापनाकडून  या सोसायट्यांना पुरवठा करण्यात येत असलेला पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे, असे रहिवासी भगवान चव्हाण यांनी सांगितले. 
 या संकुलात पाणी उपलब्ध व्हावे म्हणून  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलवाहिनी जोडलेली आहे. त्यासाठी लागणाऱ्या वीटमीटर जोडणीचे काम सध्या सुरू आहे. 
nया मीटरच्या जोडणीनंतर मुबलक व नियमित पुरवठा सुरू होणार असल्याचे उपसरपंच साईनाथ काबाडी यांनी सांगितले.