उल्हासनगरात न्यू चेलाराम मार्केटवर ७ वर्षानंतर हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:10 IST2025-12-06T17:09:17+5:302025-12-06T17:10:14+5:30
कॅम्प नं-२, शिरू चौकातील सात वर्षांपूर्वी उभी राहिलेली न्यू चेलाराम मार्केट इमारतीवर शुक्रवारी पाडकाम कारवाई करण्यात आली.

उल्हासनगरात न्यू चेलाराम मार्केटवर ७ वर्षानंतर हातोडा
उल्हासनगर : कॅम्प नं-२, शिरू चौकातील सात वर्षांपूर्वी उभी राहिलेली न्यू चेलाराम मार्केट इमारतीवर शुक्रवारी पाडकाम कारवाई करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने ही कारवाई सुरू केली असून या निमित्ताने शहरातील अवैध बांधकामांचा ज्वलंत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२, शिरू चौक परिसरात ७ वर्षांपूर्वी उभी राहिलेली न्यू चेलाराम हे तळमजला अधिक एक मजला इमारतीविरुद्ध प्रजा पार्टीचे अध्यक्ष आणि महापालिकेचे माजी सचिव प्रकाश कुकरेजा यांनी इमारती अनियमित पद्धतीने बांधल्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. मात्र प्रशासनाकडून कारवाईमध्ये टाळाटाळ होत असल्याचे पाहून, कुकरेजा यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने या बांधकामावर शुक्रवारी पाडकाम कारवाई सुरू केली. या इमारतीला एकाच दिवसी बांधकाम परवाना व इमारत पूर्णतःवाचा दाखला देण्यात आल्याचा आरोप प्रकाश कुकरेजा करून खळबळ उडून दिली.
इमारती मालक स्वतःहून पाडणार
सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारती मालकांनी न्यायालयाचा आदेश आणला आहे. आणि ते स्वतःहून एका आठवड्यात ही इमारत पाडणार आहेत. यामुळे महापालिकेवर होणारा ताण काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांनी अशा प्रकारच्या अवैध बांधकामांवरील कारवाई शहरात सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अवैध बांधकामधारकात धडकी
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर झालेल्या या कारवाईमुळे अवैध बांधकाम करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून, भविष्यात अशा बांधकामांवर महापालिका काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.