कोरोनावर मात करताच पालकमंत्री एकनाथ शिंदे 'ऑनफिल्ड'; आयुक्तांसोबत केली कोवीड रुग्णालयांची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 22:56 IST2022-01-13T22:54:58+5:302022-01-13T22:56:39+5:30
महापालिकेने व्होल्टास कंपनीच्या जागी उभारलेल्या कोवीड रुग्णालयाची पाहणी करून तेथील सुविधांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला.

कोरोनावर मात करताच पालकमंत्री एकनाथ शिंदे 'ऑनफिल्ड'; आयुक्तांसोबत केली कोवीड रुग्णालयांची पाहणी
ठाणे- गेल्या आठवड्यात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यानच्या काळात शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, चार दिवस उपचार घेतल्यानंतर शिंदे यांनी कोरोनावर मात केली. त्यांनतर गुरुवारी एकनाथ शिंदे पुन्हा ऑनफिल्ड पाहायला मिळाले. पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासोबत पोखरण रोड येथील कोविड सेंटरची त्यांनी पाहणी करून सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महापालिकेने व्होल्टास कंपनीच्या जागी उभारलेल्या कोवीड रुग्णालयाची पाहणी करून तेथील सुविधांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे, ही समाधानाची बाब असली तरी आवश्यकता भासल्यास व्होल्टास येथील या नव्या कोव्हिड रुग्णालयात रुग्ण दाखल करून उपचार सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना शिंदे यांनी दिले.
पालकमंत्री शिंदे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तर दुसरीकडे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह होते. मात्र पूर्णपणे बरे झाल्यानंतर शिंदे व शर्मा यांनी ऑनफिल्ड दौरा करून कामांची पाहणी केली.