सोशल मीडियाच्या मदतीने झाली नातू-आजोबांची पुनर्भेट

By जितेंद्र कालेकर | Updated: November 15, 2018 20:47 IST2018-11-15T20:39:11+5:302018-11-15T20:47:38+5:30

कळवा पोलिसांनी चुलबूल यादव या सत्तरवर्षीय आजोबाला त्यांच्या दहिसरच्या नातवाची सोशल मिडियाच्या मदतीने भेट घडवून दिली. एरव्ही, हद्दीवरून एखादा गुन्हा दाखल करताना १० वेळा विचार करणाऱ्या पोलिसांसमोर कळवा पोलिसांनी यानिमित्ताने एक आदर्श ठेवला आहे.

Grandfather's return with the help of social media | सोशल मीडियाच्या मदतीने झाली नातू-आजोबांची पुनर्भेट

कळवा पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्देकळवा पोलिसांची कामगिरीतीन दिवसांपासून होते बेपत्ताभोजपूरी भाषिकाचीही घेतली मदत

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोशल मीडियाच्या मदतीने कळवा पोलिसांनी चुलबूल यादव या सत्तरवर्षीय आजोबाला त्यांच्या नातवाची भेट घडवून दिली. या कामात मदत करणा-या बाबुराम यादव यांचा पोलिसांनी विशेष सत्कारही केला.
चुलबूल यादव हे कळव्याच्या सह्याद्री सोसायटीजवळ ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांना आढळले. त्यांना केवळ नाव सांगता येत होते. पण, पूर्ण पत्ता काहीच सांगता येत नव्हता. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली. चुलबूल हे दहिसर येथे मुलाकडे वास्तव्याला असून मूळचे ते बिहारचे आहेत. ते भोजपुरी भाषा बोलत होते. हिंदी किंवा मराठी त्यांना येत नव्हते. पत्ता सांगताना ते अडखळत असल्याने त्यांच्या राहण्याचे ठिकाण किंवा मुलांचा पत्ताही त्यांना नीट सांगता येत नव्हता. बागडे यांनी बाबुराम यादव या भोजपुरी बोलणा-याची दुभाषिक म्हणून मदत घेतली. त्यानेच चुलबूल यांच्याकडून माहिती काढून ती त्यांच्या फोटोसह सोशल मीडियावर टाकली. त्याआधारे त्यांच्या दहिसर येथील उज्ज्वल यादव (२४) या नातवाने कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. अखेर, १४ नोव्हेंबर रोजी नातू आणि आजोबांची पोलिसांनी बाबुरामच्या मदतीने भेट घडवून आणली. दहिसर येथून ते कळव्यात कसे भरकटले, हेही त्यांना सांगता येत नव्हते. आपले आजोबा तीन दिवसांनी तेही सुखरूप मिळाल्यामुळे नातवाला आनंदाश्रू आवरता आले नाही. या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या बाबुराम यादव यांचाही कळवा पोलिसांच्या वतीने बागडे यांनी छोटेखानी सत्कार केला. एरव्ही, हद्दीवरून एखादा गुन्हा दाखल करताना १० वेळा विचार करणा-या पोलिसांसमोर कळवा पोलिसांनी यानिमित्ताने एक आदर्श ठेवला आहे.

Web Title: Grandfather's return with the help of social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.