उत्तुंग लाक्षागृहे आणि कुचकामी यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 05:46 AM2019-01-06T05:46:58+5:302019-01-06T05:47:21+5:30

मुंबईसह ठाणे आणि भिवंडीत आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या घटनांमागे वेगवेगळी कारणे असली तरी, यामध्ये मोठी जबाबदारी प्रशासनाची आहे.

Good luck and miserable machinery | उत्तुंग लाक्षागृहे आणि कुचकामी यंत्रणा

उत्तुंग लाक्षागृहे आणि कुचकामी यंत्रणा

Next

-विजय वैद्य

भिवंडी येथे कंपन्या आणि गोदामांना आग लागण्याच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामागची खरी कारणे काहीही असली, तरी त्यावर बोलण्याऐवजी अग्निशमन दल सक्षम करणे अत्यावश्यक आहे. उंच इमारतींना परवानगी देताना अग्निशमन दलाकडे तेवढ्या सुविधा आहेत का, हे पाहण्याची तसदी कुणीच घेत नाही. अग्निशमन दलाला योग्य प्रशिक्षणही दिले जात नाही. योग्य प्रशिक्षण असते तर, कदाचित कल्याणच्या विहीर दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या जवानांचा बळी गेला नसता.
मागील काही वर्षांत ठाण्यासह भिवंडी, कल्याण, डोंबिवली आदींसह जिल्ह्याच्या इतर भागांत आगीच्या घटना वाढत आहेत. सुदैवाने यात जास्त जीवितहानी झाली नसली तरी, या घटनांमधून आताच बोध घेणे गरजेचे आहे. आगीच्या घटना रोखण्याची जबाबदारी जशी अग्निशमन विभागाची आहे, तशीच ती आपलीसुद्धा आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी अग्निशमन विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी नियमित सराव करणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे एखादी आगीची घटना घडली तर, ती तत्काळ आटोक्यात आणणे, अग्निशमन दलास शक्य होते.

मुंबईसह ठाणे आणि भिवंडीत आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या घटनांमागे वेगवेगळी कारणे असली तरी, यामध्ये मोठी जबाबदारी प्रशासनाची आहे. सोसायटीच्या ठिकाणी दर सहा महिन्यांनी आग विझवण्याच्या ज्या काही यंत्रणा बसवण्यात आलेल्या आहेत, त्यांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. केवळ थातूरमातूर तपासणी करून चालणार नाही. एखाद्या वेळी आगीची घटना घडली आणि येथील यंत्रणा कार्यक्षम नसल्यास, त्याची जबाबदारी कोण घेणार, हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. सोसायटीवाल्यांना अग्निरोधक यंत्रणा कशा हाताळाव्यात, याचे प्रात्यक्षिक देणे गरेजेचे आहे, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होऊन अग्निशमन विभागाची गाडी येईपर्यंत ते आगीवर नियंत्रण ठेवू शकतात. याशिवाय, जनजागृतीच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आग का लागते, ती लागल्यास कशा पद्धतीने प्राथमिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे, याची माहिती देणे गरजेचे आहे. परंतु, दुर्दैवाने आपल्याकडे तसे काही होताना दिसत नाही. इमारतींना दोन जिने असणे गरजेचे आहे. ओपन स्पेसमध्ये पार्किंग होऊ देता कामा नये. अग्निशमन दलाची गाडी जाईल, याची दक्षता घेणे गरजेचे आहे, फायर फायटिंगच्या यंत्रणा अद्ययावत आहेत किंवा कसे, याची वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे आहे.
विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे ९२ मीटर उंचीच्या इमारतींना म्हणजेच १५ माळ्यापर्यंतच्याच इमारतींना परवानगी देणे अपेक्षित आहे. परंतु, आपल्याकडे आता १२० मीटर उंचीपर्यंत म्हणजेच तिसाव्या मजल्यापर्यंत परवानगी दिली जाते. हे चुकीचे धोरण आहे. प्रशासनाने उंच इमारतींना परवानगी देताना, आपल्याकडे तशा प्रकारच्या आग विझवण्याच्या यंत्रणा उपलब्ध आहेत का, याची माहिती आधी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर उंच इमारतींना परवानगी देणे, केव्हाही हिताचे ठरणार आहे. उंच इमारतीच्या ठिकाणी एखाद्या वेळी आगीची घटना घडली तर ती विझवण्यासाठी आपल्याकडे सक्षम यंत्रणासुद्धा असणे गरजेचे आहे. त्या यंत्रणांची नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील अग्निशमन विभागातील दोन वाहने बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अशी वेळ भविष्यात येऊ नये. आपल्याकडे असलेल्या यंत्रणांची तपासणी, दुरुस्ती ही वेळेत झालीच पाहिजे.
ठाण्यासह जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. रहिवास क्षेत्र वाढत आहे. परंतु, जिल्ह्याच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा सक्षम होताना दिसत नाही. यंत्रणा अपुºया तर आहेतच, शिवाय मनुष्यबळही कमी आहे. मनुष्यबळ वाढवणे हा शासकीय मुद्दा आहे. परंतु असे असले तरी, आहे त्या मनुष्यबळात चांगली कामगिरी करणे हे एक प्रकारचे कसब आहे. ते अग्निशमन विभागाने दाखवलेच पाहिजे. परंतु, आपल्याकडे अग्निशमन विभागाकडे सरावाचा अभाव असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे आग विझवताना नेमके काय करणे अपेक्षित आहे, हे काही वेळा फिल्डवरील मंडळींनाच सुचत नाही. त्यामुळे कल्याणच्या विहीर दुर्घटनेत अग्निशमन विभागातील कर्मचाºयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन विभागातील कर्मचाºयांनी नियमित सराव करणे गरजेचे आहे, नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती घेणे गरजेचे आहे. रात्रीच्यावेळी एखाद्या उंच इमारतीच्या ठिकाणी मॉकड्रील करणे गरजेचे आहे.

भिवंडीसारख्या भागाचा विचार केल्यास, तिथे अनधिकृत गोदामे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी एखाद्या गोदामाला आग लागल्यास ती विझवण्यासाठी लागणारे पाणीच तिथे कमी असल्याचे वारंवार दिसून आले आहे. यावर आधी योग्य तो उपाय करणे गरजेचे आहे. या अनधिकृत गोदामांमध्ये कशाही पद्धतीने कशाचीही साठवणूक केली जाते. केमिकल साठवले जातात. परंतु, ते किती घातक आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, याची तपासणी मात्र होताना दिसत नाही. किंबहुना, गोदामधारकांकडूनसुद्धा याची माहिती दिली जात नाही. त्यामुळेच अशा प्रकारची हानी होते. याशिवाय, येथील गोदामांना लागणाºया आगीमागे इतरही कारणे आहेत आणि ती न सांगितलेलीच बरी. परंतु यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात आगीच्या घटना रोखणे कठीण ठरणार आहे. याला काही शासकीय यंत्रणा जबाबदार आहेत, असे मानले तरी या घटना रोखण्याची जबाबदारी नागरीकांचीसुद्धा आहे. त्यांचा यामध्ये सहभाग महत्त्वाचा असतो. त्यांनी याबाबत काळजी घेतली तर, आगीच्या घटनांना आपण आवर घालू शकू, यात शंका नाही.
(लेखक : ठाणे महापालिकेचे
सेवानिवृत्त अग्निशमन अधिकारी आहेत)
- शब्दांकन : अजित मांडके

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तसेच अन्य शहरांत आग लागण्याच्या घटना वरचेवर घडत आहेत. अद्याप बरीच मोठी जीवितहानी झाली नसली, तरी भविष्यातील संकट दरवाजा ठोठावत असल्याच्या दृष्टिकोनातून या घटनांकडे पाहून उपाययोजना करणे गरजेचे आहे. अनेक शहरांत उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या, तरी त्या ठिकाणी लागणारी आग विझवण्याकरिता सक्षम यंत्रयंत्रणा अनेक महापालिकांकडे नाहीत. तसेच मनुष्यबळाची कमतरता आहे. उपलब्ध अग्निशमन दलाच्या जवानांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही. त्याचबरोबर एक जागरूक नागरिक म्हणून अशा घटना टाळण्याकरिता घ्यायची खबरदारी आपणही घेत नाही.
 

Web Title: Good luck and miserable machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे