गोल्डन डाइज येथील ध्वज झाला गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:53 IST2017-08-03T01:53:36+5:302017-08-03T01:53:36+5:30
शहराच्या सांस्कृतिक आणि राष्टÑाभिमान या परंपरांमध्ये भर पडावी, म्हणून महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच गोल्डन डाइजजवळ तब्बल ३०.५ मी लांबीचा फ्लॅग मास्ट उभारला होता.

गोल्डन डाइज येथील ध्वज झाला गायब
ठाणे : शहराच्या सांस्कृतिक आणि राष्टÑाभिमान या परंपरांमध्ये भर पडावी, म्हणून महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच गोल्डन डाइजजवळ तब्बल ३०.५ मी लांबीचा फ्लॅग मास्ट उभारला होता. त्याचा मोठा दिमाखदार सोहळादेखील पार पडला होता. परंतु, अवघ्या आठवडाभरात या मास्टवरील फ्लॅगच गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत, पालिकेला विचारले असता फ्लॅग फाटल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ परंपरा जपण्याच्या नादात पालिकेने हे प्रकरण गरज नसतानादेखील ५ (२) (२) खाली मंजूर करून त्यावर सुमारे २५ लाखांचा खर्च केला होता. परंतु, आता दीड महिन्यापासून फ्लॅगच फडकत नसल्याने केलेल्या खर्चाबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.
ठाणे महापालिकेने गोल्डन डाइजनाका येथे राष्टÑीय ध्वज उभारण्याचे ठरवले होते. त्यानुसार, मे महिन्यात यासंदर्भातील प्रस्ताव ५ (२) (२) खाली मंजूर करून घेतला. या कामात डी.के. फ्लॅग फाउंडेशनमार्फत एक राष्टÑीय ध्वज, नामफलक, सिंहाचे चार पुतळे व पोडियमचे डिझाइन या बाबी विनामूल्य व ३०.५ मी लांबीचा फ्लॅग मास्ट खालीवर करण्याच्या अॅक्सेसरीजसह अँकर बोल्ट, पी.यू. पेन्टेड पोल्स आदी बाबी महापालिकेच्या आर्थिक तरतुदीतून पुरवल्या. तसेच या ठिकाणी ध्वज पोडियम, पायºया, अंतर्गत पाथवेज, विद्युत कामे करण्याचा खर्चदेखील यात अंतर्भूत करण्यात आला. त्यानुसार, या कामावर २४ लाख ९८ हजार ५५० रुपये खर्च केला. हे काम करून शहराच्या दृष्टीने आणखी एक मानाचा तुरा पालिकेने खोवल्याचे बोलले जात होते. ठाणेकरांनाही या झेंड्याकडे पाहून अभिमान वाटत होता. परंतु, अवघ्या आठच दिवसांत हा झेंडा गायब झाला आहे.
यासंदर्भात पालिकेच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ध्वज फाटला आहे. परंतु, नवा ध्वज केव्हा लागेल, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. आज दीड महिना उलटूनही तो लागलेला नाही. त्यात, आता या कामाबाबतदेखील शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. हे काम इतके गरजेचे होते का, ते ५ (२) (२) खाली करण्याची गरज होती का, असे सवालही आता उपस्थित झाले आहे.