ठाण्यात मित्राच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:46 IST2019-05-06T20:40:47+5:302019-05-06T20:46:47+5:30
मित्राकडून पैशांसाठी होणारी छळवणूक, संशयी वृत्ती आणि मारहाणीच्या प्रकाराला कंटाळून लोकमान्यनगर येथील सोनाली बसरा या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ मे रोजी घडली.

पैशाची मागणी करीत वारंवार दिली धमकी
ठाणे : पैशासाठी शारीरिक मानसिक छळ करणाऱ्या जुगल राठोड या मित्राच्या छळाला कंटाळून सोनाली बसरा (२१, रा. परेरानगर, लोकमान्यनगर, ठाणे) या तरुणीने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी टीएमटीमध्ये वाहक असलेल्या जुगलविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोनाली आणि तिचे वडील चंद्रकांत बसरा हे ठाण्यातील लोकमान्यनगर येथे वास्तव्याला आहेत. तर तिची आई अनंतनगर, खोपदा, (जव्हार, जि. पालघर) येथे वास्तव्याला आहे. सोनाली ठाण्यातील एका मॉलमध्ये नोकरी करते. गेल्या अनेक दिवसांपासून तिचा मित्र जुगल हा तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करीत होता. पैसे देण्यास तिने विरोध केल्यानंतर तिला तो मारहाणही करीत होता. तिच्यावर तो संशयदेखील घेत असे. क्षुल्लक कारणावरून तिला तो दमदाटीही करीत असे. या सर्वच कारणाला कंटाळून आपण आत्महत्या करणार असल्याचे सोनालीने जव्हार येथे असलेल्या आपल्या आईला फोनवरून ३० एप्रिल रोजी सांगितले होते. २ मे रोजी वडील काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर सकाळी १० ते ३ मे रोजी पहाटे १.१० वा. च्या दरम्यान तिने लोकमान्यनगर येथील आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचे वडील चंद्रकांत बसरा यांनी जुगल याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकारानंतर तो पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले. महिला पोलीस उपनिरीक्षक स्रेहल अडसुळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.