नालासोपारा (मंगेश कराळे) :- अखेर त्या ७ वर्षीय चिमुकल्या अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिच्याच सख्या १२ वर्षाच्या अल्पवयीन भावाला हत्येप्रकरणी ताब्यात घेतले आहे. भावानेच बहिणीची हत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे.
नालासोपाराच्या संतोषभुवन परिसरात असलेल्या पांडुरंग चाळीत मिथुन शर्मा हे पत्नी आणि दोन लहान मुलासंह राहतात. त्यांचा मोठा मुलगा १२ वर्षांचा तर मुलगी अंजली ही ७ वर्षांची आहे. शर्मा दांपत्य दिवसभर कामाला जातात. त्यांची दोन्ही मुले घरात एकटी असतात. गुरूवारी दुपारी नेहमीप्रमाणे शर्मा पती-पत्नी कामाला गेले होते. त्यांचा मोठा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. तो जेव्हा घरात परत आला तेव्हा लहान बहिणी अंजली ही स्वयंपाकघरात खाली पडली होती. अंजलीला उपचारासाठी पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल केले होते. तेथे डॉक्टरांनी तिला दाखलपूर्व मयत घोषीत केले होते
स्वयंपाक घरातून स्टूलवरून चढून काहीतरी वस्तू काढण्याच्या प्रयत्नात ती खाली पडून मरण पावली असल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी पेल्हार पोलीस ठाण्यात दिली होती. पण तिच्या गळ्याला मानेच्या उजव्या बाजूला जखम होती. घटनास्थळावर पक्कड पडलेली होती. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. पण मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली आहे.
१) आरोपी भावाला खेळण्यासाठी जायचे होते पण बहीण जाऊ देत नसल्याने त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती पण आता हत्येचा गुन्हा दाखल करत आहे. - जितेंद्र वनकोटी, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)