घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फुटणार, ठाणे कोस्टल रोडच्या कामाने धरला वेग; ८ महिन्यात ५० टक्के काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 07:27 IST2026-02-14T07:27:02+5:302026-02-14T07:27:27+5:30
८ महिन्यांत वायडक्टचे ५० टक्के काम, ‘सिंगल-पाइल, सिंगल-पियर’ प्रणालीमुळे कामाला गती

घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फुटणार, ठाणे कोस्टल रोडच्या कामाने धरला वेग; ८ महिन्यात ५० टक्के काम
मुंबई : ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील आणि अंतर्गत भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाने आठ महिन्यांतच मोठा टप्पा गाठला आहे. या प्रकल्पातील उन्नत मार्गाच्या वायडक्टचे ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे, तर या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण झाले असून आता पिअर कॅप आणि आय-गर्डर उभारणीला वेग आला आहे.
गुजरात व भाईंदर भागातून येणाऱ्या वाहनांना घोडबंदरवरून पुढे ठाण्यातील अंतर्गत भागातून पुढे जेएनपीटी, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटककडे जावे लागते. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होते. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई नाशिक महामार्ग ते गायमुख असा १३.४५ किमी लांबीच्या सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्गाचे काम हाती घेतले आहे. या मार्गामुळे ठाण्यातून पुढे जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. देशात पहिल्यांदाच एखाद्या ग्रीनफील्ड रस्ता प्रकल्पात जमिनीवर ‘मोनोपाइल फाउंडेशनसह सिंगल-पाइल, सिंगल-पियर’ प्रणालीचा वापर केला जात आहे. त्यामुळे जानेवारी २०२६ पर्यंत या प्रकल्पाचे १० ऐवजी जवळपास २० टक्के काम पूर्णत्वास गेले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पर्यावरण व प्रगतीचा मेळ
ठाणे खाडी किनाऱ्यालगतची मॅन्ग्रोव्ह (कांदळवन) परिसंस्था संवेदनशील आहे. तिचे संरक्षण करण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा भाग उड्डाणपूल आणि पुलांच्या स्वरूपात बांधला जात आहे. हा मार्ग मुंबई–नाशिक महामार्ग एनएच १६० आणि गायमुखदरम्यान थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
या मार्गांना जोडणी
ठाणे कोस्टल रोड हा गायमुख येथे प्रस्तावित ‘गायमुख-फाउंटन बोगद्याशी’ जोडला जाईल. यातून ठाणे-भाईंदर प्रवास वेगवान होईल, तसेच साकेत-आमणे एलिव्हेटेड रोड आणि कासारवडवली-खारबाव मार्गाशी जोडला जाणार आहे, तसेच ठाणे रिंग मेट्रोबरोबरही त्याची जोडणी दिली जाणार आहे. त्यातून मुंबई महानगरातील प्रवास जलद होणार आहे.