‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 06:11 IST2025-06-26T06:09:18+5:302025-06-26T06:11:10+5:30

Gadkari Rangayatan Thane: गेल्या १० ते ११ महिन्यांपासून ठाण्यातील गडकरी रंगायतनचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

'Ghanekar' will not stop unless 'Gadkari' starts! | ‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका

‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका

ठाणे : राम गणेश गडकरी रंगायतन सुरू झाल्यानंतरच डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे ठाणे महापालिकेने बुधवारी स्पष्ट केले. शहरातील दोन्ही नाट्यगृहे एकाचवेळी बंद झाल्यास ठाणेकर रसिक आणि नाट्यकलावंतांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या १० ते ११ महिन्यांपासून ठाण्यातील गडकरी रंगायतनचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, ठाणेकर रसिक मात्र हे नाट्यगृह सुरू होण्याची वाट पाहत आहेत. त्यासाठी महापालिकेने आतापर्यंत पाचदा वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या. मात्र, अद्याप हे नाट्यगृह बंदच आहे. 

नाट्यगृहातील प्रत्येक काम बारकाईने केले जात असून, ते सुरू झाल्यानंतर कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची दक्षता पालिकेकडून घेतली जात आहे. गेल्या महिन्यात खा. नरेश म्हस्के यांनी या नाट्यगृहाची पाहणी केली होती. त्यावेळी हे नाट्यगृह १५ मेपासून सुरू करण्याचे आश्वासन पालिकेने त्यांना दिले होते; परंतु, जून महिना संपत आला तरी गडकरी रंगायतन सुरू होण्याची लक्षणे दिसत नाहीत. 

‘लोकमत’च्या बातमीची दखल

‘गडकरी’ बंद असतानाच डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या छताला गळती लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे कामही पालिकेने हाती घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी येत्या ७ जुलैपासून हे नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, ठाणे महापालिकेने एक पाऊल मागे घेतले. 

घाणेकर नाट्यगृहाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बुधवारी पालिका मुख्यालयात बोलावण्यात आले होते. 
डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या छताच्या वरील बाजूची गळती बंद करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेने ठेकेदाराला दिल्या आहेत.

जोपर्यंत गडकरी रंगायतन सुरू होत नाही, तोपर्यंत घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू करू नये, असे ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. त्यामुळे नाट्यरसिक आणि नाट्यकलाकारांना दिलासा मिळाला आहे. 

महापालिकेच्या या निर्णयामुळे घाणेकर नाट्यगृहाच्या दुरूस्तीचे काम पुढे ढकलले जाणार असले तरी  पावसाळ्यासाठी येथे तातडीने प्रतिंबधक उपाययोजना कराव्यात अषी मागणी आता नाट्य क्षेत्रातील कलाकारांकडून करण्यात येत आहे.

Web Title: 'Ghanekar' will not stop unless 'Gadkari' starts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.