खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजना सुरु करा - वर्षा भानुशाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:08 IST2019-11-21T21:08:00+5:302019-11-21T21:08:19+5:30
मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजना सुरु करा - वर्षा भानुशाली
मीरारोड : मुंबई महापालिकेने शहरातील खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा योजना मोबाईल अॅपद्वारे सुरु केली असून तशीच योजना मीरा भाईंदरमध्ये सुरु करण्याची मागणी भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खड्डे जाहीरपणे दिसत असताना देखील ते तातडीने भरण्याचे काम होत नाही. पाऊस जाऊन अनेक दिवस झाले तरी खड्डे मात्र कायम आहेत.
त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेप्रमाणेच मीरा भाईंदर महापालिकेने मोबाईल अॅप विकसित करुन बक्षीस योजना सुरु करावी. नागरिकांनी दाखवलेले खड्डे २४ तासात पालिकेने भरल्यास तक्रारदार नागरिकाला ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात यावे. यामुळे शहरातील खड्डे निदर्शनास येऊन ते भरण्याचे काम वेगाने होईल. जेणेकरुन शहर खड्डे मुक्त होईल असे वर्षा भानुशाली यांनी म्हटले आहे.