मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जुळवून घ्या, आव्हाडांचा सरनाईक यांना मित्रत्वाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 07:30 IST2025-01-14T07:30:21+5:302025-01-14T07:30:43+5:30
सरनाईक यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या उपवन फेस्टिव्हलच्या स्टेजवर आव्हाड यांनी रविवारी प्रथमच हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जुळवून घ्या, आव्हाडांचा सरनाईक यांना मित्रत्वाचा सल्ला
ठाणे : शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मैत्री गेल्या ३५ वर्षांची आहे. मधल्या काळात उभयतांमधील दुरावा, अबोल्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांच्यातील दुरावा संपला. सरनाईक यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या उपवन फेस्टिव्हलच्या स्टेजवर आव्हाड यांनी रविवारी प्रथमच हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
यावेळी दोघांनी परस्परांना कोपरखळ्या मारल्या. मात्र, आव्हाड यांनी सरनाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्याचा मित्रत्वाचा सल्ला दिला. आव्हाड व सरनाईक यांनी विद्यार्थी संघटनेपासून एकत्र काम केले. मधल्या काळात या दोघांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला होता.
आव्हाड २० वर्षांनंतर मंत्री होतील
आव्हाड आणि मी लहानपणापासून मित्र आहोत. शिवाय आम्ही विद्यार्थी संघटनेत एकत्र काम केले आहे. ते माजी आणि मी आजी मंत्री आहे. तसेच, भविष्यात म्हणजेच १५-२० वर्षांनी आव्हाड हे आजी मंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे सरनाईक म्हणाले.
असा झाला दुरावा
सरनाईक यांनी २००८ मध्ये ठाणे पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. येथेच या दोन मित्रांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला. त्यानंतर २०२० पर्यंत त्यांच्यात शत्रुत्व कायम राहिले. २०२० मध्ये वर्तकनगर येथील पोलिस वसाहतीच्या मुद्द्यावरून ते एकत्र आले. मात्र, त्यावेळेस आव्हाड हे मंत्री होते आणि सरनाईक हे आमदार होते.
तुझे काम असेच प्रगतिपथावर राहो
तुझे काम असेच प्रगतिपथावर राहो. तू वेगळ्या पद्धतीने चमकावे एवढीच इच्छा व्यक्त करतो, नाही तर लोक आजकाल चमकतात. भ्रष्टाचार बाहेर येतात. काहीजणांच्या ऑर्डरला स्टे ऑर्डर मिळतात. त्या लफड्यात तू पडू नकोस. तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव. सगळे व्यवस्थित होईल, असा सल्ला आव्हाड यांनी दिला.