शहापूरच्या पेंढरी गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव; २३ घरांतील नागरिकांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:23 IST2025-09-18T18:22:10+5:302025-09-18T18:23:15+5:30
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात वैद्यकीय कॅम्प उभारण्यात आला आहे. या डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या मदतीला गांवकऱ्यांसह श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते धावत आहेत.

शहापूरच्या पेंढरी गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव; २३ घरांतील नागरिकांना लागण
ठाणे / शहापूर : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या पेंढरी गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली आहे. गावातील तब्बल २३ घरांमधील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, अनेक रुग्णांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गावातील दूषित पाणीपुरवठा ही या आजाराला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांना उलटी, जुलाब व अशक्तपणासारख्या लक्षणांचा त्रास जाणवू लागल्याने ही बाब उघड झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात वैद्यकीय कॅम्प उभारण्यात आला आहे. या डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या मदतीला गांवकऱ्यांसह श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते धावत आहेत.
या गावातील काही रुग्णांना अघई प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले, तर काही गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, शहापूर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी प्रशासनाकडून त्वरित स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. स्थानिक आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे, असे श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश खाेडका यांनी स्पष्ट केले.
पाणी उकळून वापरण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना पाणी उकळूनच वापरण्याचे आवाहन केले असून, सध्या संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.