अंबरनाथच्या केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे १२ कर्मचाऱ्यांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 13:57 IST2021-10-12T12:54:30+5:302021-10-12T13:57:47+5:30
अंबरनाथच्या आर के केमिकल्स कंपनीत वायूगळती झाल्याची माहिती समोर आली आहे या कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया करण्याचे काम केले जात होते.

अंबरनाथच्या केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे १२ कर्मचाऱ्यांना बाधा
अंबरनाथ - अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील आर. के. केमिकल्स या कंपनीत आज सकाळच्या सुमारास अचानक गॅसगळती झाली. या गळतीमुळे शेजारील प्रेसफिट नावाच्या कंपनीतील १८ ते २० कामगारांना मोठा त्रास झाला. त्यामुळे त्यांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत आर. के. केमिकल्स नावाची कंपनी असून त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया केली जाते. कंपनीत आज सकाळी नेहमीप्रमाणे डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना १० वाजताच्या सुमारास अचानक प्लँटमधला एक पाईप निसटला आणि त्यातून हवेत गॅस पसरला. हा गॅस थेट बाजूलाच असलेल्या प्रेस फिट नावाच्या कंपनीत घुसला. त्यामुळे तिथे काम करत असलेल्या १८ ते २० कामगारांना उलट्या, मळमळ, गुदमरणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कर्मचाऱ्यांनी केमिकलचा आम्हाला मोठा त्रास झाल्याचं सांगितलं.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दल, शिवाजीनगर पोलीस आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कंपनीच्याच निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याची कबुली कंपन्यांची संघटना असलेल्या ऍडीशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच 'आमा' संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली. तर या कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली.