घरफोडी व वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद: १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 22:41 IST2019-08-09T22:14:27+5:302019-08-09T22:41:42+5:30
नियोजनबद्ध गस्त आणि नाकेबंदी सुरु असतांना एका रिक्षातून सराईत चोरटयांची टोळीच पोलिसांनी पकडली. त्यांच्याकडून ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन रिक्षा, साडे तीन लाखांच्या पाच मोटारसायकली, चार मोबाइल आणि दहा हजारांची रोकड असा १६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कळवा पोलिसांची कामगिरी
ठाणे: रेल्वे स्थानक परिसरातील घरांची टेहळणी करुन घरफोडी आणि वाहनांची चोरी करणाऱ्या युसूफ शेख (२६, रा. शांती मफतलाल झोपडपट्टी, ठाणे ) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कळवा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून घरफोडीचे १३ तर वाहन चोरीचे सात असे २० गुन्हे उघड झाले असून १६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिसांची नियोजनबद्ध गस्त आणि नाकेबंदी सुरु असतांना एका रिक्षात काही संशयित वावरतांना आढळून आले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची बाब उघड झाली. यामध्ये युसूफ शेख याच्यासह पंकज मोर्या (३२, रा.सायन मुंबई ), आकाश घाडगे (२४, रा.दिघा) आकाश विश्वकर्मा (१९, रा.दिघा) आणि सुभाष यादव (२२, रा.वाघोबानगर,कळवा) या पाच आरोपींचा समावेश होता. त्यांच्याकडून कळव्यातील घरफोडीचे ११ गुन्हे, वाहन चोरीचे तीन, मुंब्रा येथील घरफोडीचे दोन तर नौपाडयातील वाहन चोरीचे दोन आणि नारपोलीतील वाहन चोरीचा एक अशा २० गुन्ह्यातील सुमारे साडे सोळा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आल्याची माहिती कुंभारे यांनी दिली.
कळवा पोलीस ठाण्याच्या परिसरात गेले काही दिवस घरफोडी व वाहनचोरीच्या घडत असल्याने पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली होती. तेव्हा वाहनांची तपासणीमध्ये या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर ही टोळी पोलिसांच्या हाताला लागली. हे सर्व सराईत गुन्हेगार असून ते रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या घरांमध्ये चो-या करीत होते. त्यांच्याकडून ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन रिक्षा, साडे तीन लाखांच्या पाच मोटारसायकली, चार मोबाइल आणि दहा हजारांची रोकड असा १६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.