ठाण्यात ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉइल चोरणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:25 IST2019-08-29T22:20:34+5:302019-08-29T22:25:23+5:30
शीळ-डायघर भागात कल्याणफाटा येथे कॉपर कॉइलची चोरी करण्यासाठी तिघा जणांचे टोळके येणार असल्याची ‘टीप’ खबऱ्यांकडून डायघर पोलिसांना मिळाली. हीच माहिती मिळाल्यानंतर ४५० किलो वजनाच्या कॉपर कॉइलसह सहा चोरांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली.

डायघर पोलिसांची कारवाई
ठाणे : ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉइल चोरणा-या प्रकाश ऊर्फ धीरज सिंग (२४, रा. शीळफाटा, ठाणे) याच्यासह सहा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या टोळीकडून एक कार आणि ४५० किलो वजनाच्या कॉपर कॉइलसह पाच लाख ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कॉपर कॉइलची चोरी करण्यासाठी तिघा जणांचे टोळके येणार असल्याची ‘टीप’ एका खबºयाकडून मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड, संतोष तागड, पोलीस हवालदार प्रकाश शिरसाठ, मारुती कदम, पोलीस नाईक दीपक जाधव, मुकुंद आव्हाड, रतिलाल वसावे, ललितकुमार वाकडे आणि कॉन्स्टेबल धनंजय आहेर आदींच्या पथकाने २१ आॅगस्ट रोजी कल्याणफाटा रोड येथे पहाटे ४.३० वा.च्या सुमारास सापळा लावला होता. त्याचवेळी तिथे आलेल्या एका संशयास्पद कारच्या कागदपत्रांची या पथकाने विचारपूस केली. तेव्हा पोलीस पथकाला पाहून कारमधील टोळके पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्यापैकी प्रकाश सिंग, शशी ऊर्फ राजू ढोले (४०, रा. डोंबिवली), आशीष गुप्ता (२४, रा. डोंबिवली) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कारच्या झडतीमधून एका बॅगमध्ये कटर, पाने, पककड, करवत आणि इतर सामग्री मिळाली. कसून चौकशीमध्ये त्यांनी या साहित्याच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉइलच्या चोरीसाठी वापर करत असल्याची कबुली दिली. शीळ-डायघर भागात दोन ठिकाणी अशा चोºया केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली. अधिक चौकशीमध्ये त्यांनी अभिषेक लाड (२३, रा. डोंबिवली), फरहान शेख (२३, रा. खारघर, नवी मुंबई) आणि मुकेश चौधरी (३९, रा. नवी मुंबई) या अन्य तीन साथीदारांची नावे उघड केली. त्यावेळी कॉइलचोरीचा हा गोरखधंदा उघड झाला. त्यानंतर त्यांचाही ठावठिकाणा शोधून या उर्वरित तिघांनाही २२ आॅगस्ट रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून कॉइलचोरीसाठी लागणारे साहित्य तसेच पाच लाख ४० हजारांची ४५० किलो कॉपर कॉइल हस्तगत केली. त्यांनी अशा प्रकारे कॉपर कॉइलच्या आणखी किती ठिकाणी चोºया केल्या आहेत, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.