बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांना गंडा घालणारी टोळी ठाण्यात जेरबंद, दोन महिलांसह १५ जणांना अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: October 3, 2022 19:26 IST2022-10-03T19:22:41+5:302022-10-03T19:26:53+5:30
ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील मुलुंड चेक नाका येथे आरएन सोल्युशन नावाने बोगस कॉल सेंटर सुरू असून कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांना गंडा घालणारी टोळी ठाण्यात जेरबंद, दोन महिलांसह १५ जणांना अटक
ठाणे- ठाण्यातील वागळे स्टेट भागात बनावट कॉल सेंटर चालवून त्याद्वारे परदेशातील नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या सिद्धेश भार्इंडकर (३३, रा. मुलूंड, मुंबई) याच्यासह १५ जणांच्या टोळीला ठाणेपोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन महिला आणि १३ पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या टोळीकडून संगणकातील हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइल फोन असा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी सोमवारी दिली.
ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील मुलुंड चेक नाका येथे आरएन सोल्युशन नावाने बोगस कॉल सेंटर सुरू असून कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सह पोलीस आयुक्त दतात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त पंजाब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली मुतडक यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक ब्रिजेश शिंंदे, चेतन पाटील आणि प्रदीप सरफरे यांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी या कॉल सेंटरवर छापा टाकला. या कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक होत असल्याचे उघड झाले.
कॉल सेंटरमधील टेलिकॉलर्स आयबी सॉफ्टवेअरचा वापर करून परदेशी नागरिकाना वेगवेगळया कारणांनी धमकावत असे. त्यानंतर गिफ्टकार्डच्या माध्यमातून ही टोळी परदेशी नागरिकांकडून खंडणी उकळत होती. या प्रकरणात कॉल सेंटर चालक सिद्धेश भाईडकर आणि सानिया जैस्वाल (२६, वागळे इस्टेट, ठाणे) यांच्यासह १६ जणांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. त्याला कायदेशीर प्रक्रीयेनंतर पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, अटकेतील सर्व आरोपींना ठाणे न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.