वाईन शॉप फोडून मद्याची चोरी करणाऱ्या चार सराईत चोरटयांच्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 00:32 IST2020-07-07T00:18:03+5:302020-07-07T00:32:50+5:30
कासारवडवली भागातील एका मद्याच्या दुकानाचे शटर उचकटून एक लाखांच्या रोकडसह मद्याच्या बाटल्यांची चोरी करणा-या मोहम्मद कलाम अन्सारी (३६, रा. दर्गा रोड, भिवंडी) याच्यासह चौघा जणांच्या सराईत चोरटयांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख आठ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

कासारवडवली पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घोडबंदर रोडवरील कासारवडवली भागातील एका मद्याच्या दुकानाचे शटर उचकटून एक लाखांच्या रोकडसह मद्याच्या बाटल्यांची चोरी करणाºया मोहम्मद कलाम अन्सारी (३६, रा. दर्गा रोड, भिवंडी) याच्यासह चौघा जणांच्या सराईत चोरटयांना अटक केल्याची माहिती सोमवारी कासारवडवली पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून आठ हजारांच्या रोकडसह आठ लाख आठ हजार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घोडबंदर रोडवरील अनमोल वाईन शॉप या दुकानातून चोरटयांनी २१ जून २०२० रोजी सायंकाळी ६ ते २२ जून रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास ही चोरी केली होती. लोखंडी शटर उचकटून दुकानातील सीसी टिव्हीचा डिव्हीआरदेखील पळविल्याने कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने गुप्तपणे पाळत ठेवून सापळा रचून यातील अन्सारी याच्यासह सरताज मलिक (२७, रा. गौरी पाडा, भिवंडी), सलमान पठाण (२७, खाडीपार, भिवंडी) आणि समीर शेख (२१, खाडीपार, भिवंडी) या चौघांना ३ जुलै रोजी अटक केली. त्यांच्याकडून काही रोकडसह एक व्हॅन जप्त करण्यात आली आहे.
हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांनी या चोरीच्या गुन्हयाची उकल करण्यासाठी काशीमीरा, मीरा रोड आणि भिवंडी येथे प्रत्यक्ष जाऊन तपास केल्यानंतर यातील आरोपींची नावे खबऱ्यांच्या मदतीने उघड करण्यात पोलिसांना यश आले.