ठाणे : जनता दरबार कोणी, कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे जनता दरबार घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी ठाण्यात केले. जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नवी मुंबईत जनता दरबार घ्या, असे सांगितल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
नाईक यांनी बुधवारी रात्री ठाण्यात वंदे मातरम् संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन घेतले. नाईक म्हणाले की, राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो. मी पालघर जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. तेथील पोलिस अधीक्षक तसेच इतर अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केल्या.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या मध्यापर्यंत पालघर जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असे त्यांनी सांगितले. तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिंदे-पवार नवी मुंबईत दरबार घेणार का?
एका कार्यक्रमात ठाण्यात आपण जनता दरबार घेणार असल्याची घोषणा नाईक यांनी केली होती. त्यानंतर ठाण्यातील राजकीय वादळ चांगलेच तापले होते.
त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील कोणताही मंत्री अशा पद्धतीने जनतेसमोर जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेऊ शकतो, त्यात वावगे काहीच नाही, असे सांगितले. परंतु आता नाईक यांनीही शिंदे आणि पवार यांनी नवी मुंबईत जनता दरबार घ्यावा असे सांगितल्याने आता हे दोघे जनता दरबार घेणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.