मित्रासोबत बोलण्यास बंदी घातल्याने मैत्रिणींनी सोडले घर; इन्स्टाग्राम डिटेल्सवरून पोलिसांनी शोधून काढले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 09:51 IST2025-12-15T09:50:42+5:302025-12-15T09:51:47+5:30
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दोन मैत्रिणी राहतात. यातील १७ वर्षीय मुलगी ही मुलुंडच्या एका मित्राबरोबर नेहमी मोबाइलवर बोलत असल्याचे कुटुंबीयांना खटकत होते.

मित्रासोबत बोलण्यास बंदी घातल्याने मैत्रिणींनी सोडले घर; इन्स्टाग्राम डिटेल्सवरून पोलिसांनी शोधून काढले!
ठाणे : मित्राबरोबर बोलू न दिल्याच्या रागातून वागळे इस्टेट येथील १६ व १७वर्षांच्या मैत्रिणी घरातून निघून गेल्या. अवघ्या २४ तासांत टिटवाळ्यातून दोन्ही मुलींना ताब्यात घेण्यात आले. त्या दोघींना सुखरूप पालकांच्या ताब्यात दिल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी रविवारी दिली.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दोन मैत्रिणी राहतात. यातील १७ वर्षीय मुलगी ही मुलुंडच्या एका मित्राबरोबर नेहमी मोबाइलवर बोलत असल्याचे कुटुंबीयांना खटकत होते.
तिचे कॉलेजकडे दुर्लक्ष होत असल्याने कुटुंबीयांनी या मित्राशी संपर्क ठेवू नये अन्यथा शिक्षण बंद करण्याचा इशारा दिला. याच रागातून तिने १६ वर्षीय मैत्रिणीला सोबत १३ डिसेंबर रोजी दुपारी २:३०च्या सुमारास घर सोडले. त्या दोघींनी इन्स्टाग्रामवर ओळख असलेल्या १७ वर्षीय मित्राचे टिटवाळ्यातील घर गाठले. दरम्यान, पालकांनी मुलींचा परिसरात शोध घेतला मात्र, त्या भेटल्या नाहीत. अखेर कुटुंबीयांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि उपनिरीक्षक रेश्मा कदम यांच्या पथकाने या दोघींचाही इन्स्टाग्रामच्या आधारे शोध घेतला. त्यांच्याकडे मोबाइल होता. मात्र, त्यात सीमकार्ड नव्हते. एकाच इन्स्टाग्राम अकाउंटवर तीन ते चार जणांचे आयडी होते. त्यांच्या मैत्रिणींकडून इन्स्टाग्राम डिटेल्स मिळवून त्याद्वारे या मुलींच्या संपर्कातील मित्र-मैत्रिणींची माहिती मिळवून लोकेशन ट्रेस करीत त्यांना रविवारी दुपारी टिटवाळा मांडा भागातील मित्राच्या घरातून ताब्यात घेतले.