Fraud of Rs 3 crore in the name of allotment of land | भूखंड देण्याच्या नावाखाली केली तीन कोटींची फसवणूक

भूखंड देण्याच्या नावाखाली केली तीन कोटींची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भूखंड देण्याची बतावणी करत राज्यभरातील २५ जणांची तीन कोटी १५ लाख ५४ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्व्हिसेस आणि यश इन्फ्राव्हेन्चर कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली. त्याला २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाण्यातील घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट येथील रहिवासी धर्मराज राव (६१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिशा डायरेक्टचा संचालक संतोष आणि त्याची पत्नी सुजाता, तसेच अन्य एक संचालक चेतन चव्हाण यांनी ठाण्यातील तीनहात नाका येथील इटर्निटी मॉलमध्ये २०१० ते २०१६ या काळात कार्यालय सुरू केले होते. याच कार्यालयातून वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याद्वारे शहापूर तसेच सातारा, कर्जत आणि कसारा याठिकाणी या प्रोजेक्टमधील प्लॉट देतो, असे सांगून वेगवेगळे प्रोजेक्ट दाखविले.  

पैसे गुंतविल्यावर दोन वर्षांच्या कालावधीनंतर गुंतवणूकदारास प्लॉट नको असल्यास त्यांनी गुंतविलेल्या रकमेच्या अर्धी रक्कम जास्त देऊन करार रद्द केला जाईल, अथवा प्लॉट पाहिजे असल्यास दोन वर्षांनंतर रितसर सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवून प्लॉट गुंतवणूकदारांच्या नावावर केला जाईल, असेही अमिष दाखविले.  दिशा डायरेक्टच्या संचालकांनी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठरल्याप्रमाणे प्लॉट आणि भरलेली रक्कम परत न देता धर्मराज आणि त्यांच्या पत्नीची १५ लाख २३ हजार ८५० रुपयांची आणि इतर २४ गुंतवणूकदारांची तीन कोटी ३१ हजार ५९ रुपयांची अशी एकूण तीन कोटी १५ लाख ५४ हजार ९०९ रुपयांची फसवणूक केली. आरोपीला २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

‘उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करणार’  
याप्रकरणी सुरुवातीला १७ गुंतवणूकदारांनी १३ ऑगस्ट २०२० रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. त्यात आणखी गुंतवणूकदारानीही तक्रार केल्याने हे प्रकरण ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने संतोष नाईक याला ५ मार्च २०२१ रोजी अटक केली. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Fraud of Rs 3 crore in the name of allotment of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.