एक कोटीचे फंडिंग करण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:46 IST2021-07-03T06:46:22+5:302021-07-03T06:46:49+5:30
संतोष तसेच त्याच्या अन्य तीन साथीदारांनी मुंबईतील नायगाव येथील रहिवासी असलेल्या चित्तरंजन सिंग (२३) यांना वेब सिरिज तयार करण्यासाठी एक कोटीचे फंडिंग करतो, असे आमिष दाखविले

एक कोटीचे फंडिंग करण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वेब सिरिजला एक कोटीचे फंडिंग करण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक करणाऱ्या संतोष गोविंद मोरे (४६, रा. कोपरी, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याला १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
संतोष तसेच त्याच्या अन्य तीन साथीदारांनी मुंबईतील नायगाव येथील रहिवासी असलेल्या चित्तरंजन सिंग (२३) यांना वेब सिरिज तयार करण्यासाठी एक कोटीचे फंडिंग करतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी सिंग यांना अगरवाल याने २० लाखांची रोख रक्कम घेऊन कापूरबावडी ते बाळकूम रोडवर रेवाळी तलावाच्या बाजूला २७ जून रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बोलाविले. तिथे संतोष मोरे, इमरान आणि अन्य एका अनोळखीने आपसात संगनमत करून, त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली. नंतर त्यांनी सिंग यांच्याकडील २० लाख रुपयांची बॅग घेऊन तिथून कारमधून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी सिंग यांनी २९ जून रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.