अंबरनाथ-बदलापूरला चौदाव्या वित्त आयोगाचे ५३.५३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:35 IST2019-09-06T00:35:24+5:302019-09-06T00:35:37+5:30
नगरविकासला मुहूर्त सापडला : दोन वर्षांपासून रखडले होते अनुदान

अंबरनाथ-बदलापूरला चौदाव्या वित्त आयोगाचे ५३.५३ कोटी
ठाणे : १४ व्या वित्त आयोगांतर्गत अखेर २०१७-१८ चे अनुदान वितरीत करण्यास राज्य शासनास मुहूर्त सापडला असून त्यानुसार राज्यातील ९४ स्थानिक स्वराज्य संस्थांना ५५० कोटी ९१ लाख रुपयांचे अनुदान वितरीत केले आहे. यात अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या वाट्याला ५३ कोटी ५३ लाख ६५ हजार ३० रुपये आले आहेत.
शहराची लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारे हे अनुदान पायाभूत सुविधांसाठी वितरीत करण्यात येते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून केंद्राकडून ते मिळालेले नव्हते. अखेर २७ आॅगस्ट रोजी ते नगरविकास विभागाकडे जमा झाल्यानंतर बुधवारी ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यात वर्ग केले. अंबरनाथ नगरपालिकेच्या वाट्याला ३१ कोटी ५२ लाख २९ हजार ५२३ रुपये तर बदलापूरच्या हिश्याला २२ कोटी एक लाख ३५ हजार ५०७ रुपये आले आहेत.
५० टक्के रक्कम स्वच्छ भारतसाठी खर्चाचे बंधन
केंद्र शासनाकडून १४ व्या वित्त आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानापैकी ५० टक्के रक्कम हीजिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने घनकचºयाचे संकलन, वाहतूक, त्यावरील प्रक्रियेसह शौचालये बांधकाम, वनीकरणावर खर्च करण्याचे बंधन आॅगस्ट २०१५ मध्ये नगरविकास विभागाने घातले आहे. तसेच हागणदारीमुक्त झालेल्या ठिकाणांचे सौंदर्यीकरण, सुशोभिकरणासह शौचालयांच्या दुरुस्तीवर खर्च करावी, असे स्पष्ट केले आहे. यामुळे अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकांना यातील २६ कोटी ७६ लाख ८२ हजार ५१५ रुपये यावर खर्च करावी लागणार आहे.