आगीच्या १८४ घटनांमध्ये वनसंपदा जळून खाक; जंगल वाचविण्यासाठी प्रयत्नांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 00:35 IST2021-03-27T00:34:51+5:302021-03-27T00:35:13+5:30
शहापूर तालुक्यातील चित्र : नागरिकांनी वणवे विझविण्यासाठी वनविभागाला सहकार्य करण्याकरिता व वने किती महत्वाची आहेत

आगीच्या १८४ घटनांमध्ये वनसंपदा जळून खाक; जंगल वाचविण्यासाठी प्रयत्नांची गरज
जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुका जसा डोंगरदऱ्या असणारा तसाच तो जंगलांनी भरलेला तालुका आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या जंगलांना लागणाऱ्या वणव्यामुळे ही वनसंपदा आता धोक्यात आली असून ती वाचविण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक वनौषधी असून शिकारीच्या हेतूने वा अनावधानाने लागलेल्या आगीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे, लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे ही संपदा आता धोक्यात आली आहे. गेल्या वर्षभरात १८४ घटनांमध्ये वनसंपदा खाक झाली आहे.
कसारा, वाशाळा, डोळखांब, वासिंद, शहापूर या सर्वच परिसरात दररोज वणवे लावले जात असून यामुळे मोठमोठी झाडे पेटल्याने उन्मळून पडत आहेत. शिकारीच्या उद्देशाने तर काही जंगले तस्करीच्या उद्देशाने तर अगदी बोटावर मोजण्याइतकेच वणवे नैसर्गिक आपत्तीतून निर्माण होत आहेत. मात्र हे वणवे विझविण्यासाठी गावकरी पुढे येताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याची कारणमीमांसा केल्यानंतर आज शेतीचे प्रमाण कमी झाले असून त्यासाठी लागणारे गवत लागत नसल्याने नागरिक वणवे विझविण्यासाठी पुढे येत नसल्याची बाब उघड झाली आहे. या मागचे कारण शोधणे गरजेचे आहे.
नागरिकांनी वणवे विझविण्यासाठी वनविभागाला सहकार्य करण्याकरिता व वने किती महत्वाची आहेत, त्यांचे संगोपन व संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी कीर्तनाची जोड दिली जात असून गाव परिसरात जनजागृती केली जात आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक वसंत घुले, प्रकाश चौधरी, प्रियांका उबाळे, संदीप तोरडमल, प्रशांत निकाळजे, मयूर बोठे व वन क्षेत्रपाल जयवंत फर्डे प्रयत्न करीत आहेत.