डॉमिनोजच्या पिझ्झात आढळली माशी; कल्याणमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 23:02 IST2019-07-24T23:01:19+5:302019-07-24T23:02:19+5:30
डॉमिनोज सेंटरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी विचारला जाब

डॉमिनोजच्या पिझ्झात आढळली माशी; कल्याणमधील प्रकार
कल्याण: डॉमिनोज सेंटरच्या पिझ्झामध्ये माशी आढळून आल्यानं या सेंटरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कल्याण पश्चिमेला असलेल्या बिर्ला महाविद्यालयाच्या समोर असलेल्या डॉमिनोज सेंटरमध्ये ही घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काल रात्री ११ वाजता अजय आवटे नावाच्या ग्राहकानं डॉमिनोजमधून पिझ्झा घेतला. यावेळी त्याला पिझ्झामध्ये माशी आढळून आली. त्यानं याबद्दलचा जाब तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारला. मात्र त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केल्यानं आवटेंनी याची माहिती मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कदम यांना दिली. यानंतर कदम यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह दुकानात जाऊन जाब विचारला. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण सुरू करताच डॉमिनोजमधील कर्मचारी घाबरले. त्यांनी चित्रीकरण थांबवण्याची विनंती मनसेच्या कार्यकर्त्यांना केली. मात्र कर्मचाऱ्यांनी कोणतंही ठोस उत्तर न दिल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी महात्मा फुले पोलिस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली.