बर्निंग कारमध्ये पाच लाखांची रोकड खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 22:56 IST2019-09-24T22:55:05+5:302019-09-24T22:56:04+5:30
सुदैवाने मोटारीचा चालक थोडक्यात बचावला

बर्निंग कारमध्ये पाच लाखांची रोकड खाक
भिवंडी : मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली गावच्या हद्दीत एका धावत्या अर्टिगा मोटारीला अचानक आग लागण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. आगीत मोटारीमध्ये असलेली पाच लाखांची रोकड जळून खाक झाली मात्र सुदैवाने मोटारीचा चालक थोडक्यात बचावला. डॉ. सुंदरलाल प्रजापती असे मोटार जळालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. सोनाळे येथे राहत असून ते त्यांच्याकडे असलेली पाच लाखांची रोकड अंजुरफाटा येथील बँकेत जमा करण्यासाठी त्यांच्या मोटारीमधून मुंबई नाशिक महामार्गाने निघाले होते. सरवली येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर असताना मोटारीच्या इंजिनमधून अचानक धूर येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून ते मोटारीबाहेर पडले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण मोटार आगीच्या भक्षस्थानी पडली. या आगीत प्रजापती यांनी बँकेत भरण्यासाठी सोबत घेतलेली पाच लाखांची रोकड जळून खाक झाली. आगीच्या झळीत डॉ. प्रजापती किरकोळ जखमी झाले.
आगीची माहिती रांजनोली बायपास नाका येथील वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लगतच्या पाइपलाइनमधून पाणी उपलब्ध करून देऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीची नोंद कोनगांव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.