भातसा धरणाचे पाच दरवाजे बुधवारी उघडणार; गावांना सतर्कतेचा इशारा
By सुरेश लोखंडे | Updated: July 19, 2022 17:58 IST2022-07-19T17:57:50+5:302022-07-19T17:58:36+5:30
Bhatsa Dam : भातसा नदी किनाऱ्यावरील विशेषःत शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदी काठावरील इतर गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

भातसा धरणाचे पाच दरवाजे बुधवारी उघडणार; गावांना सतर्कतेचा इशारा
ठाणे : भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. या वाढलेल्या पावसामुळे धरणातील संभाव्य पाणी साठा वाढणार आहे. त्यामुळे उद्या बुधवारी म्हणजे 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे पाच वक्रद्वार उघडून सुमारे सहा हजार 215.44 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भातसा नदी किनाऱ्यावरील विशेषःत शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदी काठावरील इतर गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या भातसा धरणाची आज दुपारी 12.30 वाजेपर्यंत 138.10 मीटर एवढी पाणी पातळी होती. धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात वाढत्या पावसामुळे आणखी संभाव्य पाण्याचा येवा वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियमित करण्यासाठी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे 1 ते 5 क्रमांकाची वक्रद्वारे 0.50 मीटरने उघडण्यात येणार आहेत. यातून धरणातील सहा हजार 215.44 क्युसेक पाणी भातसा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे, असे भातसा नगर येथील पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे भातसा नदीच्या किनाऱ्यावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व इतर गावांमध्ये प्रशासनाने सतर्क राहण्याची सूचना केली आहे. धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे या काळात नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीच्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.