पहिल्या टप्प्यातील कामाला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 02:01 IST2019-04-27T02:01:19+5:302019-04-27T02:01:22+5:30
कल्याण-शीळ महामार्ग सहापदरीकरण : सात किमीसाठी ३० मे पर्यंत डेडलाइन

पहिल्या टप्प्यातील कामाला आला वेग
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : महाराष्टÑ राज्य रस्ते विकास प्राधिकरणातर्फे (एमएसआरडीसी) कल्याण-शीळ महामार्गाचे सहापदरीकरण सुरू आहे. २१ किलोमीटरच्या या रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात सात किलोमीटरचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा खोदकाम करण्यात आले आहे. महामार्गाला समांतर नव्या मार्गिका तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विविध तांत्रिक कामांमुळे मंदावलेले हे पहिल्या टप्प्यातील काम ३० मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा टप्पा पावसाळ्यापूर्वी वाहनचालकांना खुला केला जाणार आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. सहापदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास वाहतुकीची समस्या गंभीर बनेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सात किमीचे काम १५ ते ३० मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोर्डे यांनी दिली. सात किलोमीटरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यांच्या दुतर्फा कडेला प्रत्येकी चार मीटर खोदकाम केले आहे. त्या ठिकाणी भरणी, सपाटीकरण सुरू आहे.
या रस्त्यावर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता भविष्यात वाहतूककोंडीची समस्या उद्भवू शकते. त्यादृष्टीने कल्याण-शीळ या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. सध्या तेथे दुतर्फा दोन मार्गिका सुरू आहेत. त्यामध्ये आता दोन्ही दिशांना एका लेनची भर पडणार आहे. त्यामुळे छोटी वाहने दुचाकी, रिक्षा, टेम्पो आदी तिसऱ्या मार्गिकेमधून जातील. खोदकाम सहा महिन्यांपासून सुरू होते. जेसीबीद्वारे काम केले. दरम्यान, त्या कामामध्ये अडथळे येणारी अतिक्रमणे, महावितरणचे वाहिनी आदी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली. काही दिवसांपासून खोदलेल्या ठिकाणी रोलर लावून जमिनीचे सपाटीकरण, पुन्हा खडीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरणासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होण्याचा विश्वास एमएसआरडीसी अधिकारी व्यक्त करत आहेत. पावसाळ्यानंतर उर्वरित १४ किमीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे बोर्डे यांनी सांगितले.
विविध कामे होणार
एकूण २१० कोटींचा निधी या रुंदीकरणाच्या कामासाठी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामध्ये आतापर्यंत अंदाजे ८ ते १० कोटींचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी सुमारे ८० कोटींचा निधी लागण्याची शक्यता आहे. तीन रेल्वे ओव्हरब्रिज, उड्डाणपूल आणि रेलिंग, दुभाजक आदी अन्य तांत्रिक कामे उर्वरित निधीतून होणार असल्याचे बोर्डे म्हणाले. एका रेल्वे ओव्हरब्रिजचा खर्च सुमारे ३० कोटींचा असल्याचेही सांगण्यात आले.