बदलापूरमध्ये माथाडी संघटनेच्या उपाध्यक्षांवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 04:46 IST2018-10-03T04:45:38+5:302018-10-03T04:46:20+5:30

बदलापूरची घटना : थोडक्यात बचावले

Firing at the Vice President of Mathadi Association in Badlapur | बदलापूरमध्ये माथाडी संघटनेच्या उपाध्यक्षांवर गोळीबार

बदलापूरमध्ये माथाडी संघटनेच्या उपाध्यक्षांवर गोळीबार

बदलापूर : मागील अनेक दिवसांपासून शांत असलेले बदलापूर शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले. माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश कुडेकर यांच्यावर मंगळवारी सकाळी गोळीबाराचा प्रयत्न झाला. मात्र, सुदैवाने हल्लोखारांचे पिस्तुल न चालल्याने कुडेकर बचावले. मात्र यावेळी एक गोळी हवेत उडाल्याने परिसरात खळबळ उडाली.

तीन वर्षांपूर्वीच्या हत्या आणि गोळीबाराच्या प्रकरणानंतर बदलापूर शहरात शांतता होती. या वातावरणाला मंगळवारी अचानक गालबोट लागले. बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी भागात सकाळी दहाच्या सुमारास कुडेकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. शिवसेनाप्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष असलेले कुडेकर सकाळी आपल्या कार्यालयात जात असताना दबा धरून बसलेल्या दोन दुचाकीस्वारांनी कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तुल न चालल्याने त्यांचा डाव फसला. या वेळी कुडेकर यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्याने ते रमेशवाडीच्या दिशेने गेले. मात्र काही सेकंदात ते पुन्हा कुडेकर यांच्याकडे आले आणि पुन्हा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही गोळी सुटली नाही. त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत तेथून पळ काढला. त्यामुळे कुडेकर थोडक्यात बचावले. याची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. कुडेकर हेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली.

टोळीयुद्धाचा दाट संशय
टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. गोळीबार करणारे आरोपी हे दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत की नाही याची माहिती पोलीस घेत आहे. दोघांनीही हेल्मेट घातल्याने त्यांची ओळख पटणे अवघड जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Firing at the Vice President of Mathadi Association in Badlapur