माजी नगरसेवक संजेश पातकर यांच्यावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 06:09 IST2019-07-03T23:56:56+5:302019-07-04T06:09:45+5:30
या घटनेने बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवक संजेश पातकर यांच्यावर गोळीबार
बदलापूर : कुळगाव - बदलापूर नगरपरिषदेतील माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक संजेश पातकर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने संजेश या हल्ल्यातून बचावले. या घटनेने बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी (ता.३) संध्याकाळी संजेश पातकर त्यांच्या कर्जत रोडवरील मनोरमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कार्यालयाच्या आवारात उभे होते. त्यावेळी पल्सर मोटरसायकलवरुन दोन अज्ञात इसम त्यांच्या कार्यालयासमोर आले. या दोघांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते. तसेच त्यांनी चेहराऱ्यावर मास्क घातला होता. त्यांनी संजेश यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यावेळी संजेश बाजूला पळाल्याने थोडक्यात बचावले.
या घटनेचे वृत्त समजताच बदलापूर पूर्व व पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी तातडीने याठिकाणी पोहचले. सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील,पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे आदींनीही घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. पोलिसांनी याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, हा हल्ला कुणी व कशासाठी केला? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.