Fear of unpaved speeding vehicles on the road; Report of Senior Citizens | रस्त्याने चालताना बेफाम वेगाने धावणाऱ्या वाहनांचे वाटते भय; ज्येष्ठ नागरिकांची तक्रार
रस्त्याने चालताना बेफाम वेगाने धावणाऱ्या वाहनांचे वाटते भय; ज्येष्ठ नागरिकांची तक्रार

डोंबिवली : पूर्व व पश्चिम रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालक हे ज्येष्ठ नागरिकांशी अत्यंत उद्धट वर्तन करतात. भाडे नाकारतात. कर्णकर्कश हॉर्न वाजवत बेफाम वेगाने रिक्षा व इतर वाहने चालवतात, त्यामुळे रस्त्यावरून चालताना दडपण येते. कधी कुठले वाहन धडक मारेल, याचा नेम नाही, त्यांना शिस्त लावा, असे शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांना गाºहाणे घातले. कराळे यांचे भाषण मध्येच थांबवून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्याकडे कैफियत मांडली.

डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी आणि ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी ज्येष्ठांसमवेत पोलिसांच्या संवादाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठांनी कराळेंचे भाषण थांबवून आधी रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या मनमानीचे काय करता ते सांगा, असे विचारले. कराळे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ते म्हणाले की, कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरांतील रिक्षाचालकांबाबत काय करायचे, त्यावर निश्चित विचार केला जाईल. ज्येष्ठांनी एकाकीपणाची भावना बाळगू नये. धकाधकीच्या जीवनात पाल्यांना, नातवांना ज्येष्ठांसाठी वेळ देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मुलांनीही वेळात वेळ काढून ज्येष्ठांसमवेत चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले. डोंबिवलीसह अन्य शहरांमधील ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यांमध्ये ज्येष्ठांनी सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. तसेच कोणत्याही पोलीस ठाण्याने ज्येष्ठांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, असे आदेश त्यांनी कल्याण, डोंबिवली पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले. जर पोलीस ठाण्यात तक्रार घेतली गेली नाही तर एसीपी, डीसीपी अधिकाऱ्यांना ज्येष्ठांनी थेट संपर्क साधावा, असेही कराळे म्हणाले.

सायबर क्राइमसंदर्भात अ‍ॅड. सुरेंद्र पवार यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मोबाइल हाताळताना काळजी घ्यावी. ज्येष्ठांनी शक्यतो आॅनलाइन पेमेंट करू नये तसेच मोबाइलवर स्वत:ची वैयक्तिक माहिती देऊ नका, सेल्फी काढून स्वत:च्या कुटुंबीयांची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. घराबाहेर जाताना अनोळखी व्यक्तीला माहिती देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले की, १०० व १०९० ही हेल्पलाइन असून त्यावर थेट संपर्क करावा, समस्या असल्यास ती सोडवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असेल. ज्येष्ठांनी सतत कार्यमग्न राहावे. उतारवयात तरुणपणी कामाच्या व्यापात राहिलेले छंद जोपासणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश पारखे यांनी २००७ च्या ज्येष्ठ नागरिक कायद्यासंदर्भात पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना केली.

अरुण हेडाव यांनी डोंबिवली ज्येष्ठांकरिता सुरक्षित शहर असल्याची भावना व्यक्त केली. विजया ठाकरे यांनी ज्येष्ठांच्या समस्या मांडल्या, दुसºयांवर विश्वास ठेवा, प्रेम, आपुलकी वाढवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कुलकर्णी यांनी केले. ज्येष्ठांना सहकार्य करणाºया पोलीस कर्मचाºयांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Web Title: Fear of unpaved speeding vehicles on the road; Report of Senior Citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.