तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे लसीकरणासाठी होतेय गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:28+5:302021-05-08T04:42:28+5:30

कल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. सध्याची दुसरी लाटही भयावह आहे. आताच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवल्याने ...

Fear of a third wave leads to a rush for vaccinations | तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे लसीकरणासाठी होतेय गर्दी

तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे लसीकरणासाठी होतेय गर्दी

Next

कल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. सध्याची दुसरी लाटही भयावह आहे. आताच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करीत आहेत. त्यात लसीचा तुटवडा आणि लाभार्थ्यांची संख्या जास्त, अशी स्थिती असल्याने अनेक केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन कोलमडून पडत आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष देण्याची अपेक्षा सामन्यांकडून व्यक्त होत आहे.

रामबागेतील गुरुनानक शाळेतील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी नागरिकांची गर्दी झाली होती. तेथे जागरूक नागरिक योगेश दळवी पहाटे ५ वाजताच पोहोचले होते. मात्र, १० वाजता त्यांना टोकन दिले गेले. टोकन क्रमांक ७५ होता. दुपारी ४ वाजता त्यांचा नंबर आल्यानंतर त्यांना लस दिली गेली. लस घेण्यासाठी त्यांना ११ तासांची प्रतीक्षा करावी लागली. लसीकरणास वेळ लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.

काही मंडळी तर पहाटे ५ वाजेपासून लस घेण्यासाठी रांग लावतात. तेथे नागरिकच एका फूल स्केप पेपरवर नावे नोंदवत होते. मात्र, १० वाजता लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी आल्यावर आजच्या दिवशी १५० जणांनाच टोकन दिले जाईल, अशी घोषणा केली; परंतु रांगेत त्यापेक्षा जास्त जण असल्याने त्यांना निराश होऊन घरी परतावे लागते. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते पहाटेपासून रांग लावतात. काही ठिकाणी लसीचा डोस संपल्याचे सांगण्यात येते.

नागरिकांचा मते लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना स्लॉट बुकिंग दिसत नाही. काही वेळेस दुसरीच लसीकरण केंद्रे दाखविली जातात. प्रत्यक्षात आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्रावर ऑनलाइन स्लॉट बुकिंगशिवाय लस दिली जात नाही. तेथेही सर्वच वयोगटांतील नागरिक लसीकरणासाठी जात आहेत, तर काही ठिकाणच्या लसीकरण केंद्रांच्या ठिकाणची जागा अरुंद असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो.

लसीकरणास आलेल्यांना संसर्गाची भीती

आर्ट गॅलरी हे लसीकरण केंद्र हे कोविड रुग्णालयाला लागूनच आहे. त्यामुळे तेथे लसीकरणासाठी आलेल्यांना कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रच हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

- दुसरी लाटेत ऑक्सिजन, बेडअभावी रुग्णांचे मृत्यू झाले, तर अनेकांना वेळेत इंजेक्शन मिळाली नाहीत. इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा झाला. हे पाहता तिसरी लाट अधिक भीतीदायक असेल, असे नागरिकांना वाटत आहे. त्यामुळेच नागरिक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे त्यांना लसीसाठी वणवण करावी लागत आहे.

----------------------

Web Title: Fear of a third wave leads to a rush for vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.