भिवंडीत परतीच्या पावसामुळे भात शेती धोक्यात; शेतकरी हवालदिल
By नितीन पंडित | Updated: October 13, 2022 16:08 IST2022-10-13T16:07:37+5:302022-10-13T16:08:04+5:30
यावर्षीच्या उत्तम पावसामुळे शेतात भात पीक जोमाने आले असून बळीराजा देखील सुखावला आहे.मात्र परतीच्या पावसाने काही दिवसांपासून सायंकाळी हजेरी लावत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

भिवंडीत परतीच्या पावसामुळे भात शेती धोक्यात; शेतकरी हवालदिल
भिवंडी - भिवंडीत परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणीसाठी तय्यार होत असलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात असून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील भात शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.परतीच्या पावसामुळे तालुक्यातील ३ हजार हेक्टरहुन अधिक भात पिकाचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
भिवंडीत हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भातशेती आहे.त्यापैकी ३ हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पीक घेण्यात येते. सध्या अनेक ठिकाणी हे पीक तय्यार झाले आहे.पुढच्या दहा बारा दिवसात दिवाळी सण येऊ घातल्याने या सणा पूर्वीच भात पिकाची कापणी करून ते घरात आणण्यासाठी काही शेतकऱ्यांची लगबग सुरु केली आहे.मात्र मागील आठवड्यापासून मुसळधार वारा पावसामुळे भात शेती धोक्यात आली असून हाता तोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे मातीमोल होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
यावर्षीच्या उत्तम पावसामुळे शेतात भात पीक जोमाने आले असून बळीराजा देखील सुखावला आहे.मात्र परतीच्या पावसाने काही दिवसांपासून सायंकाळी हजेरी लावत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली, वडवली, अनगांव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगांव, मुठवळ, चिंबीपाडा, कुहे, धामणे, खारबांव, पाये, पायगांव, खार्डी, एकसाल, सागांव, जुनांदुर्खी, टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, बासे, मैदे, पाश्चापूर आदी गावांमध्ये भात शेती केली जात असून सध्या हे भात पीक कापणीसाठी जवळपास तयार झाले आहे मात्र परतीच्या पावसामुळे हे पीक धोक्यात आले असून शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या खावटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.जर परतीचा पाऊस आणखी काही दिवस असाच पडत राहिला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून बळीराजा आणखीन कर्जबाजारी होण्याची शक्यता वाढली आहे.