ठाण्यात हिऱ्याच्या नावे बनावट खडे; १० काेटी ५० लाखांचा गंडा, एक हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:50 IST2025-06-02T08:48:32+5:302025-06-02T08:50:20+5:30

सात जणांना ठोकल्या बेड्या

Fake stones in the name of diamonds of Rs 10.50 crore fraud, one thousand investors cheated; Seven people arrested | ठाण्यात हिऱ्याच्या नावे बनावट खडे; १० काेटी ५० लाखांचा गंडा, एक हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

ठाण्यात हिऱ्याच्या नावे बनावट खडे; १० काेटी ५० लाखांचा गंडा, एक हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: हिऱ्याच्या नावाखाली बनावट खड्यांची विक्री करून एक हजार ४१ जणांना दहा कोटी ५० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या  फसवणूकप्रकरणी तीन युक्रेनियनसह सात आराेपींना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत अटक केली आहे.  यातील सहा फरारी आराेपींचा शाेध घेण्यात येत आहे. याच गुन्ह्यात आणखीही काही गुंतवणूकदारांची फसवणुकीची शक्यता आहे. त्यामुळे अशाप्रकारे टाेरेसद्वारे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन ठाणे पाेलिसांनी केले आहे.

अस्सल हिऱ्याच्या नावाखाली प्रयोगशाळेत निर्मित मोजेनाइट खडे विकून, तसेच गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या    कल्याण खडकपाडा भागातील टोरेस ज्वेलर्स या कंपनीविरोधात राबोडी पोलिस ठाण्यात जानेवारीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला हाेता. खडकपाडा पोलिस ठाण्यातही याप्रकरणी गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल केला हाेता. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

खडकपाडा भागातील प्लॅटिनम हर्न या कंपनीच्या टोरेस ज्वेलर्स या दागिने व हिऱ्याच्या शोरूमच्या माध्यमातून हिऱ्याच्या दागिन्यांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली. माेठ्या किमतीच्या हिरे व दागिने खरेदीच्या गुंतवणुकीवर दर आठवडा ४ ते ११ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ग्राहकांना आकर्षित केले.

घर, गाडी देण्याचेही आमिष

गुंतवणूकदारांच्या नावाने लकी ड्रॉच्या नावाखाली घर, गाडी देण्याचेही आमिष दाखवले. अशा योजनांच्या आमिषामुळे शेकडो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली हाेती. मात्र, गुंतवणूकदारांना काेणताही परतावा दिला नाही. ग्राहकांनी खरेदी केलेले हिरेही बनावट असल्याची बाब समाेर आली.

तक्रारीसाठी पुढे या...

टाेरेसची काही मालमत्ता पाेलिसांनी जप्त केली आहे. इतरही काही मालमत्ता जप्त केली जाणार आहे. फसवणुकीतील गुंतवणूकदारांना न्यायालयाच्या संमतीने मालमत्ता विक्रीमधील रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी गुंतवणुकीच्या कागदपत्रांच्या आधारे  तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन  आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलिस आयुक्त दत्तात्रय पाबळे यांनी केले आहे.

Web Title: Fake stones in the name of diamonds of Rs 10.50 crore fraud, one thousand investors cheated; Seven people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.