कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये दुपटीपेक्षा जास्त आवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 17:23 IST2018-11-28T17:13:45+5:302018-11-28T17:23:09+5:30
वाशी मार्केटमधील संपामुळे कल्याणची आवक वाढली

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये दुपटीपेक्षा जास्त आवक
डोंबिवली : माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे वाशी एपीएमसी मार्केटचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र यामुळे कल्याणच्या एपीएमसी मार्केटला भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या संपामुळे शेतकऱ्यांनी आपला माल वाशीऐवजी कल्याणला नेला आहे. त्यामुळे एरव्ही १५० गाड्यांची आवक होणाऱ्या कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये आज ३०० पेक्षाही जास्त भाजीपाल्याच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये इतकी प्रचंड आवक झाल्यानं भाजीपाल्याचे दरही कोसळले आहेत. तर वाशी किंवा मुंबईत भाजीपाला जात नसल्यानं ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यातूनही कल्याणला किरकोळ व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे कल्याण मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. दरम्यान, व्यापाऱ्यांचं एकमत झालं, तर उद्या कदाचित कल्याण मार्केट बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.