अखेर ‘त्या’ सांगाड्याचे गूढ उकलले; हरियाणातून खुनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:33 IST2020-07-25T00:33:10+5:302020-07-25T00:33:32+5:30
चार दिवसांत पोलिसांनी लावला छडा

अखेर ‘त्या’ सांगाड्याचे गूढ उकलले; हरियाणातून खुनी पकडले
बोईसर : आई-वडील व बहिणीच्या मदतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह प्लास्टिकच्या पिंपात कोंबून राहत्या खोलीतच ठेवून बोईसर सोडून हरियाणा येथे दीड वर्षापूर्वी पलायन केलेल्या चार आरोपींना बोईसर पोलिसांनी हरियाणातून पकडून गुरुवारी आणले आहे. बंद खोलीत सांगाडा मिळाल्याची घटना चार दिवसांपूर्वीच समोर आली होती.
बोईसर येथील गणेश नगरमध्ये लोकेश मारवाडी यांच्या चाळीत पवन झा (५०) आपल्या कुटुंबासह राहत होता. फेब्रुवारी २०१९ ला तो कुटुंबासह अचानक बोईसर सोडून परराज्यात निघून गेला, मात्र तो मनी ट्रान्स्फरद्वारे नियमित घरभाडे मालकाला पाठवीत होता. मागील चार महिन्यांचे भाडे न मिळाल्याने घर मालकाने दुसऱ्या भाडोत्रीला सदर खोली देण्याच्या उद्देशाने उघडली असता एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये मानवी सांगाडा आढळून आला होता.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जलदपणे तपास सुरू करून पोलीस उपनिरीक्षक आशीष पाटील यांच्यासह चार पोलीस पथके हरियाणाला पाठवली होती. तेथे पथक पोहचताच त्यांनी प्रथम हरियाणाच्या गुरु ग्राममधील पैशांच्या हस्तांतरणाचे दुकान शोधून काढून मयत बुलबुलचा पती दीपक झा (२१), सासरे पवन झा (५०), सासू बच्चूदेवी झा (४५), नणंद नितू ठाकूर (३०) या चार जणांना शिताफीने शोधून काढून त्यांना जेरबंद करून बोईसरला आणले आहे. त्यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याचे कसबे यांनी सांगितले.