"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 00:15 IST2025-11-02T00:14:17+5:302025-11-02T00:15:29+5:30
Marathi Schools: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पाटील यांचा सत्कार सोहळा शनिवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला.

"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
ठाणे : “शासनाने मराठी शाळांसाठी किमान पटसंख्या सांगू नये. एक विद्यार्थी जरी वर्गात असेल, तरी त्या विद्यार्थ्याला शिकवले पाहिजे. मराठी शाळेची तुकडी चालली पाहिजे. कुणास ठाऊक, त्या एका विद्यार्थ्यातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर घडतील!” असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी ठाण्यात केले.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पाटील यांचा सत्कार सोहळा शनिवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला. ते म्हणाले की, “मराठी भाषा अशा टप्प्यावर आहे, जिथे तिचे साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ते धोक्याच्या रेषेवर गेली आहे. जशी आपण आजारी आईची काळजी घेतो, तशीच काळजी आपण मराठी भाषेची घेतली पाहिजे. ती उराशी जपली पाहिजे, संवर्धन केले पाहिजे. शासनाकडून मदत मिळाली तर ती घ्यावी, पण भाषेचे रक्षण हे लोकांनीच करायचे असते कारण हा लोकांचा उठाव आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान दोन ते तीन मराठी भवन उभारले पाहिजेत. मात्र त्याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहू नये. पूर्वी जशा जिल्हा परिषदेच्या शाळा उन्हापावसापासून संरक्षित असायच्या, तशाच भावनेने ही भवनं उभी केली पाहिजेत.”
त्यांनी सुचवले की, “ज्येष्ठ नागरिक, ज्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत, ते आपली जागा मराठी भवनासाठी देण्यास तयार आहेत. अशा व्यक्तींना भेटून संवाद साधावा. प्रत्येक मराठी भवनात लहानसे ग्रंथालय असावे. नाना-नानी पार्कमध्ये फक्त फिरायला पाठवण्याऐवजी त्यांना मराठी भवनात सहभागी करून घ्या. त्यातून भाषेचे आणि संस्कृतीचे जतन होईल.”
पाटील म्हणाले, “जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी मुले अत्यंत बुद्धिमान असतात. महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले बहुतांश शास्त्रज्ञ हे अशाच मराठी माध्यमातील शाळांत शिकलेले आहेत. माझ्या काळात दहा-पंधरा विद्यार्थ्यांची मर्यादा घालण्यात आली असती, तर मीसुद्धा आज येथे नसतो. त्यामुळे शिक्षणासाठी संख्या नव्हे तर गुणवत्ता महत्त्वाची आहे.”