नाट्याकर्षक जाहिरातींचे युग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:21 AM2018-04-22T05:21:54+5:302018-04-22T05:21:54+5:30

त्यांना मुळात अक्षरांची आवड नव्हती, तर चित्रकलेची होती. स्केचेसची होती.

The era of theatrical advertisements | नाट्याकर्षक जाहिरातींचे युग

नाट्याकर्षक जाहिरातींचे युग

Next

डॉ. सुधाकर फडके

कमल शेडगे एका वृत्तपत्रात आर्ट सेक्शनमध्ये होते. त्यांचे अक्षर छान होते. त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती पृथ्वीश गांगुलींमुळे. त्यांनी बंगाली पुस्तकातले नमुने दाखवले. हे नमुने पाहून कमल यातील लोटरिंंग पद्धतीचा वापर करून देवकी, वेड्याचे घर उन्हात, आचार्य, इथे ओशाळला मृत्यू, औषध नलगे मजला वगैरे मराठी नाटकांच्या जाहिराती केल्या.
त्यांना मुळात अक्षरांची आवड नव्हती, तर चित्रकलेची होती. स्केचेसची होती. सुप्रसिद्ध नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर हेही त्यावेळी तिथे होते. दोघेही कोकणचे असल्यामुळे त्यांची मैत्री होती. तळाशीलकर नोकरी सांभाळून डिझाइन्सची, नेपथ्याची कामे करत. गोवा हिंदू असोसिएशनचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’चे नेपथ्य तळाशीलकरांचे होते. त्यांनी शेडगेंना या नाटकाच्या डिझाइनचे काम दिले.
तत्पूर्वी शेडगेंनी काही नाटकांची डिझाइन्स केली होती. रायगडनंतर मत्स्यगंधा आहे. पुढे ‘गारंबीचा बापू’ ‘गुलमोहन’ ही नाटके आली. अनेक नाटकांचे डिझाइन शेडगेंनी केले. काही वेळा एकाच नाटकाची त्यांनी वेगवेगळी डिझाइन्स केली. जवळजवळ सर्व निर्मात्यांकडे त्यांनी काम केले. १९६७ साली नाट्यसंपदाच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचे व त्यानंतर अनेक वर्षांनी राहुल देशपांडेंनी आणलेल्या त्याच नाटकाचे डिझाइन त्यांचेच होते.
काचेचा चंद्र नाटकाला अपेक्षित बुकिंग होत नव्हते. तेव्हा तोंडवळकरांनी श्रीराम लागू हे भावनाला खांद्यावर उचलून नेत आहेत, अशी बोल्ड डिझाइन करायला शेडगेंना सांगितले. नंतर हे नाटक चालले. नाट्यनिर्माते व फोटोग्राफर मोहन वाघ यांच्याशी त्यांची ओळख झाली. वाघ निरनिराळ्या मासिकांसाठी फोटो काढायचे व कमल शेडगे त्याची सजावट करायचे, असे २२ वर्षे चालले होते. शेडगे नाटकाची संहिता प्रथम वाचत. त्यामुळे त्यातली मध्यवर्ती कल्पना शेडगे नाटकाच्या डिझाइनमधून दाखवतात. कमलने नाटकाच्या केलेल्या जाहिरातीचे प्रदर्शन पुणे व इतर ठिकाणी भरवलं होतं, तेही गाजलं. त्यांची कमलाक्षरे, माझी अक्षरगाथा व चित्राक्षरे अशी तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
ठाण्यातील नौपाडा भागातील अप्पा महाशब्देंना मी जवळजवळ ५० वर्षांपासून ओळखतो आहे. आम्ही एकाच शाळेतले. डॉ. बेडेकर विद्यामंदिरमधील. दोघांनाही नाटकाचे वेड असल्यामुळे आमची मैत्री आजतागायत आहे. आम्ही नाटककार श्याम फडके यांच्या एका बालनाट्याचे नेपथ्य केले होते.
याव्यतिरिक्त अप्पांनी ‘एक होतं भांडणपूर’, ‘गाणारी मैना’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’, ‘अलिबाबा व चाळीस चोर’ इ. नाटकांची नेपथ्येही केली होती. जन्मत:च सुवाच्य अक्षर असलेले अप्पा पुढे नाटकांच्या जाहिरातींकडे वळले. ठाण्यात ६०-७० च्या दशकात नाटके कमीच लागत. मो.ह. विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल किंवा बेडेकर शाळेच्या मैदानात लागणाऱ्या जाहिरातींचे बोर्ड अप्पा बनवू लागले. त्याकाळी फ्लेक्स नव्हते. सुरुवातीला ठेकेदार मोहन जोशी आणि नंतर विद्याधर ठाणेकर, रमेश मोरे या ठेकेदारांनीही त्यांना कामे दिली. पुढे अनेकविध कार्यक्रमांसाठी लागणारी गौरवचिन्हे, स्मृतिचिन्हे, बॅनर्स, मानपत्रे, साइनबोर्ड अशा गोष्टी ते करू लागले.
१९७० च्या सुमारास आळतेकर व कोल्हटकर स्पर्धा जोरात होत्या. मी कामावरून सुटल्यावर तेथे जात असे. आज जेथे शारदा थिएटर आहे, तेथे कोल्हटकर स्पर्धेची नाटके व्हायची. गेटजवळ ‘३Ÿ४’ च्या नाटकाचे ८-१० बोर्ड एका लायनीत ठेवलेले असायचे. हे बोर्ड सुंदर अक्षरात लिहिलेले असत. एक दिवस तो रंगवणारा पेंटर भेटला. त्याचे नाव अनिल लेले असावे. तो ठाकूरद्वार, गिरगाव येथील भीमराव बिल्डिंगमध्ये राहत असे. हातात रंग, ब्रश, पांढरे कागद, गोंद वगैरे घेऊन येई व बोर्ड रंगवण्याचे काम तासाभरात करून जात असे. लाकडाच्या बोर्डावर पांढरा कागद चिकटवून वॉटर कलर्सने तो नाटकाची नावे, कलाकार इत्यादी मजकूर लिहायचा. आमच्या लहानपणी खेडेगावात नाटके होत. त्याची जाहिरात पत्रके टांग्यातून किंवा छकड्यातून वाटली जात. तसेच गावात नाक्यानाक्यांवर छापील बोर्ड लावत असत.
अशोक हांडे यांनी गेली काही वर्षे ‘मराठी बाणा’ची जाहिरातही वेगळेपणाने केलेली आहे. जाहिरात वृत्तपत्रात येते, त्या दिवशीच्या प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो जाहिरातीत टाकतात. सर्वसाधारण नाटकांच्या जाहिरातीपेक्षा त्या वेगळ्या वाटतात.

sudhakarphadke76@gmail.com

Web Title: The era of theatrical advertisements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.