कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 06:16 IST2025-11-11T06:12:06+5:302025-11-11T06:16:08+5:30
Thane News: ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, चाैकशी करण्यात येत असल्याची माहिती कापूरबावडी पाेलिसांनी साेमवारी दिली.

कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
ठाणे - ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, चाैकशी करण्यात येत असल्याची माहिती कापूरबावडी पाेलिसांनी साेमवारी दिली.
कापूरबावडीत १९९० पासून प्रवीण खुराना (४४) यांचा शीतल परिवहन हा व्यवसाय आहे. देशभर त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती आहे. या कंपनीत चालक आणि क्लीनर मिळून ८०० कर्मचारी आहेत. या फर्ममध्ये राजेंद्र ऑपरेशन मॅनेजर, तर धीरेंद्र हे लाेडिंग इन्चार्ज म्हणून कार्यरत हाेते. चालक आणि क्लीनर यांच्या वेतन आणि व्यवसायाची सर्व बिले देण्याचे काम हे दाेन्ही मिश्रा पाहत हाेते. काैटुंबिक कारणाने त्यांचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेत कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मिश्रा यांनी आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी दाेघांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता. कंपनीत अधिक अपहार झाल्याने चाैकशी केली असता, धक्कादायक प्रकार उघड झाला.
अशी करायचे फसवणूक
बाेगस चालकांचे वेतन दुसऱ्या चालकांच्या खात्यावर वळवून ते स्वत:च्या किंवा नातेवाइकांच्या खात्यावर वळवायचे. पार्किंगबाबत मूळ कंपनीची डिजिटल पावती, त्यावरील वाहनाचे तासांचा रीतसर उल्लेख न करता बनावट व्हाऊचर बनवायचे.
नातेवाइकांच्या खात्यामध्ये वळवायचे रक्कम
२०२१ ते २०२४ दरम्यान त्यांच्या कंपनीत राजेद्रकुमार, धीरेंद्र तसेच शुभम दुबे, पंकज पांडे आणि सिदनेशकुमार जाखर यांनी संगनमत करून चालकांच्या वेतनात ३५ लाख ७१ हजार २६५ इतकी अतिरिक्त रक्कम मिळवून स्वत:सह त्यांच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात ऑनलाइन वळती केली.
ट्रक पार्किंगच्या बनावट कॅश व्हाऊचर छापून त्यांच्या शीतल परिवहन फर्मची एक काेटी २० लाखांची रक्कम, अशी एक काेटी ५५ लाख ७१ हजार २६५ रकमेचा अपहार केला.