वीजबिलांची थकबाकी पोहोचली ६०० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST2021-02-26T04:55:26+5:302021-02-26T04:55:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळातील वीजबिल थकबाकी ६०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे थकबाकीसह चालू वीजबिल ...

Electricity bill arrears reach Rs 600 crore | वीजबिलांची थकबाकी पोहोचली ६०० कोटींवर

वीजबिलांची थकबाकी पोहोचली ६०० कोटींवर

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळातील वीजबिल थकबाकी ६०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे थकबाकीसह चालू वीजबिल वसुलीसाठी सध्या व्यापक मोहीम सुरू आहे. त्यात ग्राहकांनी आतापर्यंत ७३३ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे. परिमंडळातील इतर ग्राहकांनीही चालू वीजबिलासह थकबाकी भरून कठीण आर्थिक परिस्थितीत महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कल्याण परिमंडळात सर्व वर्गवारीचे जवळपास २६ लाख वीजग्राहक आहेत. यातील दोन लाख ३२ हजार ग्राहकांनी मार्च २०२० नंतर गेल्या वर्षभरात वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नव्हता. या ग्राहकांकडे २३० कोटींची थकबाकी होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने पाठपुरावा व विनंती केल्यानंतर यातील एक लाख ५४ हजार ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाचा भरणा केला. परंतु, अजूनही ७८ हजार ग्राहकांनी वीजबिल भरलेले नसून, त्यांच्याकडे ७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी चोरून अथवा इतरांकडून वीजपुरवठा सुरू ठेवल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व अनधिकृतपणे वीज देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी दहा पथकांची करडी नजर या ग्राहकांवर राहणार आहे.

फेब्रुवारीत ६६० कोटी रुपये चालू वीजबिल व ६७५ कोटी रुपये थकबाकी, अशा एकूण एक हजार ३३५ कोटींचा भरणा आवश्यक होता. परंतु, ६०० कोटी रुपयांच्या थकीत वीजबिलाची अद्याप वसुली होऊ शकलेली नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

२०२ कोटींचा ऑनलाइन भरणा

फेब्रुवारीत आतापर्यंत २०२ कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाइन प्रणालीद्वारे झाला आहे. सात लाख ८० हजार ५०० ग्राहकांनी डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडला. कोरोनाचा पुन्हा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकाधिक ग्राहकांनी सुलभ असलेल्या डिजिटल माध्यमांचा वापर करून ऑनलाइन भरणा करावा, असे सांगण्यात आले.

------

Web Title: Electricity bill arrears reach Rs 600 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.