उल्हासनगरात निवडणूक यंत्रणेचा सावळागोंधळ, दुचाकीवरून ईव्हीएम नेल्याने राडा, उमेदवारांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 23:12 IST2026-01-15T23:10:09+5:302026-01-15T23:12:47+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४, हनुमाननगर येथील मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वाचे साहित्य कोणत्याही पोलीस संरक्षणाशिवाय दुचाकीवरून नेण्याचा प्रयत्न रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान केला.

उल्हासनगरात निवडणूक यंत्रणेचा सावळागोंधळ, दुचाकीवरून ईव्हीएम नेल्याने राडा, उमेदवारांचा संताप
सदानंद नाईक
उल्हासनगर : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या मतदान प्रक्रियेत निवडणूक यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. कॅम्प नंबर ४ मधील हनुमाननगर येथील मतदान केंद्रावर, चक्क दुचाकीवरून कोणत्याही सुरक्षेशिवाय ईव्हीएम मशीन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून स्थानिक उमेदवारांनी निवडणूक प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, हनुमाननगर येथील मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वाचे साहित्य कोणत्याही पोलीस संरक्षणाशिवाय दुचाकीवरून नेण्याचा प्रयत्न रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान केला. हा प्रकार परिसरातील सतर्क नागरिकांच्या लक्षात आला. केंद्रापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना अडवले आणि जाब विचारला. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसह पुन्हा मतदान केंद्रावर आणले. यावेळी निवडणूक यंत्रणेचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आल्याने केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. निवडणूकीतील स्थानिक उमेदवार अॅड. जय गायकवाड आणि संदीप गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
ईव्हीएम सारख्या संवेदनशील वस्तूची ने-आण करण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग पारदर्शकतेच्या गप्पा मारते, मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांकडून इतका हलगर्जीपणा होतोय. सुरक्षेशिवाय दुचाकीवर मशीन नेणे हे संशयास्पद असून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
साधारणपणे मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन बंदोबस्तात नेण्यासाठी विशेष वाहनांची सोय असते. मात्र, उल्हासनगरमध्ये कर्मचाऱ्यांनी दुचाकीचा वापर का केला? त्यांना सुरक्षा का पुरवण्यात आली नव्हती? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकारामुळे मतदानाच्या गोपनीयतेवर आणि सुरक्षिततेवर नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.