भिवंडी वकील संघटनेची निवडणूक म्हणजे नव्या परिवर्तनाची नांदी - ऍड.किरण चन्ने
By नितीन पंडित | Updated: March 24, 2023 19:19 IST2023-03-24T19:18:43+5:302023-03-24T19:19:08+5:30
या निवडणुकीत चन्ने हे अध्यक्ष पदाचे उमेदवार होते मात्र अवघ्या १३ मतांनी चन्ने यांचा पराभव झाला असून अध्यक्ष पदी ऍड. दिनेश्वर पाटील हे विजयी झाले आहेत.

भिवंडी वकील संघटनेची निवडणूक म्हणजे नव्या परिवर्तनाची नांदी - ऍड.किरण चन्ने
भिवंडी -भिवंडी वकील संघटनेची निवडणूक म्हणजे नव्या परिवर्तनाची नांदी आहे अशी प्रतिक्रिया भीमा कोरेगाव आयोगाचे वकील ऍड किरण चन्ने यांनी शुक्रवारी वंजारपट्टी नाका येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. भिवंडी वकील संघटनेच्या २०२३-२५ या दोन वर्षांच्या कार्यकारणीसाठी २१ मार्च रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत चन्ने हे अध्यक्ष पदाचे उमेदवार होते मात्र अवघ्या १३ मतांनी चन्ने यांचा पराभव झाला असून अध्यक्ष पदी ऍड. दिनेश्वर पाटील हे विजयी झाले आहेत.
भिवंडी न्यायालयात अनेक वर्षांपासून काही मोजक्या लोकांची मक्तेदारी होती हि मक्तेदारी आपण मोडण्याचा यावेळी प्रयत्न केला असून आमच्या परिवर्तन पॅनलचे ऍड सुयोग म्हात्रे हे सरचिटणीस पदी तर ऍड सुधीर भोईर हे खजिनदार पदी निवडून आले आहेत त्यामुळे ही महत्वाची पदे परिवर्तन पॅनलकडे असल्याने माझी जरी हार झाली असली तरी परिवर्तनवादी वकील बंधू भगिनींचा व पॅनलचा विजय झाला आहे असेही चन्ने यांनी यावेळी सांगितले.
भिवंडी वकील संघटनेच्या मागील कार्यकारिणीचे अध्यक्ष ऍड मंजीत राऊत यांनी वकील संघटनेच्या बँक खात्यात २१ लाख रुपयांची एफडी केली आहे. यापूर्वी इतकी मोठी रक्कम वकील संघटनेच्या बँक खात्यात कधीच जमा झालेली नव्हती. तसेच न्यायालयात ग्रंथालय व वकिलांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा मिळवून दिल्या आहेत.ऍड राऊत हे आमच्या सोबत असल्याने काही वकिलांना राऊतांनी केलेले नवे परिवर्तन पचनी पडले नसल्याने जातीपातीच्या राजकारणाबरोबरच राजकीय नेते पुढाऱ्यांचा हस्तक्षेप करून विरोधी पॅनलच्या वकिलांनी हि निवडणूक लढवली व जिंकली असल्याचा आरोप यावेळी चन्ने यांनी केला असून परिवर्तन पॅनलला अध्यक्षपद जरी मिळाले नसले तरी सरचिटणीस व खजिनदार हि महत्वाची पदे आपल्या पॅनलकडे असल्याने भविष्यात सक्षम विरोधी पक्षनेता व वकिलांच्या न्याय हक्कासाठी आपण सदैव तत्पर राहून कार्य करू अशी प्रतिक्रिया शेवटी ऍड किरण चन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.