उल्हासनगरात वृद्धेची ८५ लाखाची फसवणूक, २५० ग्राम सोनेही लुबाडले; तिघा विरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:21 IST2025-06-11T16:21:23+5:302025-06-11T16:21:33+5:30
पैसे व सोन्याची मागणी वृद्धेने त्यांच्याकडे केली असता, वृद्धेला मारहाण करून हाकलून दिले.

उल्हासनगरात वृद्धेची ८५ लाखाची फसवणूक, २५० ग्राम सोनेही लुबाडले; तिघा विरोधात गुन्हा
सदानंद नाईक
उल्हासनगर : वृद्धेच्या असाय्यतेचा फायदा घेऊन ८५ लाख ७१ हजाराची फसवणूक करून २५० ग्राम सोने लुबाडल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी तिघा विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात ७४ वर्षाच्या कांता सुरेशलाल जेसवानी राहतात. २ फेब्रुवारी २०२४ ते १ एप्रिल २०२५ दरम्यान कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट येथील राजेश उर्फ जगदीश जग्याशी, वर्षा जगदीश जग्याशी व जिया निलेश लुधवानी यांनी संनगंमत करून, कांता जेसवानी यांनी मोबाईल फोनद्वारे युनियन बँकेच्या खात्यातून आयएमपीसी, एनइएफटी, आयएमपीएद्वारे सही करून ठेवलेले ८५ लाख ७० हजार ९९९ रुपयाचे चेक घेऊन ते बँकेत जाऊन परस्पर वठवून फसवणूक केली. तसेच जगदीश जग्याशी याने मुलाच्या मदतीने २५० ग्राम वजनाचे सोने लुबाडले. पैसे व सोन्याची मागणी वृद्धेने त्यांच्याकडे केली असता, वृद्धेला मारहाण करून हाकलून दिले.
वृद्ध कांता जेसवानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून आपबीत्ती पोलिसांना कथन केली. घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी कांता जेसवानी यांच्या तक्रारीवरून तिघा विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी वृद्धेला न्याय देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.