Eknath Shinde: 'CM साहेब भिवंडी अख्खी खड्ड्यातय', ठाण्यातील बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 16:42 IST2022-07-12T16:40:51+5:302022-07-12T16:42:02+5:30
भिवंडीतून कल्याणला जात असलेल्या बस ड्रायव्हरने बस चालवताना हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

Eknath Shinde: 'CM साहेब भिवंडी अख्खी खड्ड्यातय', ठाण्यातील बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल
ठाणे - पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून अपघाताच्या घटना घडत आहेत. तर, मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून रस्त्यांत खड्डेही पडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्नही चांगलाच समोर आला. ठाण्याचे नेते आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्याच्या रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तर, दुसरीकडे ठाण्यातील खड्ड्यांवरुन जनतेत तीव्र नाराजी आहे. आता, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या कल्याणमधील एका बस ड्रायव्हरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
भिवंडीतून कल्याणला जात असलेल्या बस ड्रायव्हरने बस चालवताना हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्यामध्ये, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बस चालवताना होणारी कसरत आणि त्रास त्याने आपल्या शब्दात मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे.
अहो मुख्यमंत्री साहेब, शिंदेसाहेब. आता, बघा हे कल्याणचे खड्डे. भिवंडी अख्खी खड्यातय वो साहेब. तुम्ही भिंवडीला बघा, काहीतरी करा. विचार चालला होता पंढरपूरला जायचा, पण मी अजून इथंचंय. साहेब थोडीशी आमच्यावर दया करा आणि हे खड्डे बुजवा ओ इकडचे. लोकांना या खड्ड्यांचा भरपूर त्रास होतोय. मी बस चालवतोय म्हणून मला कळतंय हे खड्डे काय आहेत. एक विचार करा, या खड्ड्यांमुळे किती लोकांना त्रास होतो. तुम्ही नवीन मुख्यमंत्री झालाय, आता भिवंडीला तुमच्या हातात घ्या. ही भिवंडी तुमचं नाव काढेल, एवढचं माझं म्हणणंय, अशी कळकळीची विनंती बस ड्रायव्हरने व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भिवंडी - रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या बसचालकाची मुख्यमंत्र्यांना व्हिडिओतून विनंती pic.twitter.com/f0CFS7YAyp
— Lokmat (@lokmat) July 12, 2022
दरम्यान, रस्त्यांची दूरवस्था आणि दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पडलेले खड्डे, यामुळे वाहन चालक व नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेऊन रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधत अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत. मात्र, येथील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या तीव्रतेने पुढे येत आहे. विशेष म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड हेही रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. सोमवारी त्यांनी मुंब्रा बायपासवरील खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली.