लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दोन दिवसांपूर्वी कळवा परिसरातील शरद पवार गटातील सात माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. शनिवारी आणखी चार माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला.
मनोहर साळवी, मिलिंद साळवी, अपर्णा साळवी आणि आरती गायकवाड या माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. कळव्यात शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांना शिंदेसेनेने आणखी मोठा धक्का दिला आहे. कळव्यातील आव्हाड यांचा बुरुज ढासळला आहे. कळव्याच्या जीवावर भाजपने सत्तेची गणिते मांडली होती, परंतु त्यांच्या स्वप्नांना शिंदेसेनेने सुरुंग लावला आहे. सत्तेच्या गणितांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेने आपले लक्ष कळवा भागाकडे केंद्रित केले आहे.
एका रात्रीत प्लॅन
शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांना भाजपने गळाला लावण्याचा प्लॅन केला होता, परंतु एका रात्रीत शिंदेसेनेने त्यांचा प्लॅन उधळून लावत शरद पवार गटाचे सात माजी नगरसेवक आपल्या गोटात आणले. त्यानंतर दोनच दिवसांत याच भागातील आणखी चार माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदेसेनेत प्रवेश केला.