जागा विकसित करण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची आठ कोटींची फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Updated: September 22, 2020 23:57 IST2020-09-22T23:50:38+5:302020-09-22T23:57:25+5:30
जागा विकसित करुन सदनिका देण्याच्या नावाखाली मुंबई ठाण्यातील गुुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणाऱ्या सचिन शेलार (४५) याला चितळसर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून आरोपींची ११ कोटींची मालमत्ताही जप्त केली आहे.

आरोपींची ११ कोटींची मालमत्ताही जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंंबईच्या घाटकोपर येथील जागा विकसित करुन सदनिका देण्याच्या नावाखाली मुंबई ठाण्यातील गुुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणाऱ्या सचिन शेलार (४५) याला चितळसर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील ‘ओरियन बिझनेस पार्क’ येथे अमित लखनपाल याचे बांधकाम विकासाचे कार्यालय होते. मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील सहयाद्रीनगर भागात जागा असून ती विकसित केली जाणार आहे. याठिकाणी एआए प्रकल्पही मंजूर आहे. तिथे कमी किंमतीमध्ये सदनिकांची विक्री केली जाणार असल्याची जाहिरात नाकपाल आणि त्याच्या भागिदारांनी एका वर्तमानपत्राद्वारे केली होती. या जागेवर एसआरए प्रकल्पही राबविला जात असल्याचीही बतावणी करण्यात आली होती. याच जाहिरातीच्या आधारे मुंबई ठाण्यातील अनेकांनी सदनिकेसाठी गुंतवणूक केली. सुरुवातीची बुकींग रक्कम भरल्यानंतर दोन वर्षांत सदनिकेचा ताबा दिला जाईल, असे भासविण्यात आले. त्यामुळे कोणाकडून ५० लाख, काहींकडून एक कोटी तर कोणाकडून दीड कोटींच्याही रकमा घेण्यात आल्या. अशा सुमारे ७० गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. कहर म्हणजे यातील काही गुंतवणूकदारांना तर अलॉटमेंट लेटरही देण्यात आले. प्रत्यक्षात कोणालाही सदनिका किंवा पैसेही देण्यात आले नाही. यासंदर्भात चितळसर पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१८ मध्ये तक्रार दाखल झाली होती. २०१५ ते २०१७ या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांचे पैसे घेण्यात आले होते. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड आणि पोलीस निरीक्षक भिलारे यांच्या पथकाने राजेश थापर (४५) आणि तुषार जोशी (३७) या दोघांना मार्च २०२० मध्ये अटक केली होती. त्यांची सध्या अंतरिम जामीनावर कोविडमुळे ठाणे न्यायालयाने सुटका केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सचिन शेलार (४५) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बिटकॉईन प्रकरणात अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याचाही सहभाग या प्रकरणात असल्याची माहिती पुढे आल्यामुळे ठाणे न्यायालयामार्फतीने तळोजा कारागृतून सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली २१ सप्टेबर रोजी शेलार यालाही चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून आरोपींची ११ कोटींची मालमत्ताही जप्त केली आहे. उर्वरित दोन आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.