पत्नीची हत्या करून प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न, कल्याणमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 02:18 IST2017-09-10T02:17:56+5:302017-09-10T02:18:43+5:30

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्राध्यापकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी कल्याणमधील लोकग्राम गृहसंकुलातील शरयू इमारतीत घडली.

Efforts of Professor's suicide by killing wife, welfare incidents | पत्नीची हत्या करून प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न, कल्याणमधील घटना

पत्नीची हत्या करून प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न, कल्याणमधील घटना

कल्याण : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्राध्यापकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी कल्याणमधील लोकग्राम गृहसंकुलातील शरयू इमारतीत घडली. विद्या तेली (३७) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर पती संजय तेलीला (४५) खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
संजय तेली हा घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून त्याचे नेहमी पत्नी विद्याशी वाद होत असत. शनिवारी दुपारी त्याने विद्या हिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर, स्वत:च्या दोन्ही हातांच्या नसा आणि गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. काही वेळाने त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरातील प्रकार बघून भयभीत झालेल्या मुलाने आरडाओरडा केला. तसेच वडिलांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. संजयवर तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे कोळसेवाडी पोलिसांनी सांगितले.
तेली दाम्पत्याला १९ आणि २२ वर्षांची दोन मुले आहेत. ते दोघेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. या दोघांनाही या घटनेमुळे जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत.
दरम्यान, तेली कुटुंबीय अनेक वर्षांपासून कल्याणमध्ये वास्तव्याला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Efforts of Professor's suicide by killing wife, welfare incidents

टॅग्स :Crimeगुन्हा