ठाणे : आलिशान कारला ठाणे महापालिकेचा लोगो लावून ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्यांचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला. मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्जची तस्करी करणारे तन्वीर अन्सारी (२३) व महेश देसाई (३५, दोघेही रा. मुंब्रा) या तस्करांना अटक करून त्यांच्याकडून ३१.८४ कोटींचे १५ किलो एमडी जप्त केले.
कार कोणाची? : अन्सारीकडील कारवर ठाणे पालिकेचा लोगो होता. त्याचा मित्र सोहेलकडून ती त्याने घेतली होती. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात सोहेल कारागृहात आहे. सोहेलने ती कार एकाकडून विकत घेतली. त्यामुळे ही कार नेमकी कोणाची आहे, त्याचाही शोध घेण्यात येत आहे.
कारवाई कुठे?
भिवंडीतील रांजनोली बायपासजवळील नाशिक-ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर ही कारवाई करण्यात आली.
दोघांवर गुन्हा दाखल
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले की, भिवंडी बायपासजवळ बीएमडब्लूसह दोन मोटारने आलेल्या अन्सारी आणि देसाई या दोघांना वाहनांसह ताब्यात घेतले. अन्सारीच्या कारमधून ११ किलो ७६३ ग्रॅम तर देसाई याच्या बीएमडब्ल्यू कारमधून ४ किलो १६१ ग्रॅम एमडी जप्त केले. एनडीपीएस कायद्याखाली या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.